Pune Crime News | परीक्षेपूर्वीच मुल्यांकन चाचणीची प्रश्नपत्रिका सोशल मीडिया प्रसारित; 6 युट्युब चॅनेलविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | शालेय विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून घेण्यात येणार्या नियतकालिक मूल्यांकन चाचणी (पॅट ३) परीक्षेची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावरील यु ट्युब चॅनेल प्रसारित करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात सहा यु ट्युब चॅनेलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या डॉ. मनीषा ताठे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन लर्न विथ मी, जी के ट्रेसर ऑफिशियल, एनपी रिटर्नथिंगस, अॅकेडेमिक एज्युकेशन, प्रियाघरात आरझेपी स्कुल, कैलास सर मॅथ्स या ६ यु ट्युब चॅनेलधारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांचे मराठी, इंग्रजी, गणित या विषयांचे मूल्यांकन करण्यासाठी दरवर्षी या कलचाचणीचे आयोजन केले जाते. राज्यभरातील शाळा, खासगी अनुदानित शाळांमधील सुमारे ३० लाख विद्यार्थी ही परीक्षा देतात. मात्र, परीक्षा होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका सोशल मीडियात प्रसारित झाल्याचे उघडकीस आले.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षमता, गणित, इंग्रजी, मराठी विषयातील कल जाणून घेण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून नियतकालिक मूल्यांकन चाचणी (पॅट ३) ही परीक्षा घेण्यात येते. ११ एप्रिल रोजी मराठी भाषेचा संकलित चाचणी प्रश्नपत्रिका क्रमांक एक, १५ एप्रिल रोजी गणित विषय संकलित चाचणी प्रश्नपत्रिका २, २२ एप्रिल रोजी इंग्रजी विषय प्रश्नपत्रिका ३ या विषयांची परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. प्रश्नपत्रिका महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषषदेकडून तयार करण्यात येते.
पुण्यातील एका खासगी मुद्रणालयातून प्रश्नपत्रिकांची छपाई केली जाते. प्रश्नपत्रिका छापल्यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वितरण करण्यात येते. ही प्रक्रिया गोपनीय असते. मात्र, परीक्षा होण्यापूर्वीच सहा चॅनेलवर मराठी, इंग्रजी, गणित या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका प्रसारित झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर डॉ. ताठे यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली.
या प्रकरणी महाराष्ट्र विद्यापीठ मंडळाच्या, तसेच अन्य परीक्षांमध्ये होणार्या गैरप्रकारास प्रतिबंध अधिनियम १९८२ चे कलम ५, ६ अन्वये आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर प्रश्नपत्रिका प्रसारित कशी करण्यात आली, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण घोडके तपास करत आहेत.
ही प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर प्रसारित झाली तरी त्यातील २ परीक्षा अगोदर झाल्या होत्या. तिसरी परीक्षा आज २२ एप्रिल रोजी होती. प्रश्नपत्रिका अगोदर प्रसारित झाल्या तरी ही परीक्षा सुरळीत पार पडली. ज्यांनी ही प्रश्नपत्रिका यु ट्युबवर पाहिली असेल, त्यांना पेपर सोपा गेला असेल. मात्र, त्यामुळे मुलांचा कल समजणे अवघड होणार आहे.
