Pune Crime News । प्रयागराज येथून पिस्टल आणून विक्री करण्याचा प्रयत्न करणार्या गुन्हेगाराला पकडून खंडणी विरोधी पथकाने जप्त केली 4 गावठी पिस्टल, 3 जिवंत काडतुस
पुणे : Pune Crime News । उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून देशी बनावटीचे पिस्तुल आणून त्यांची पुण्यात विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या गुन्हेगाराला खंडणी विरोधी पथकाने पकडले़ त्याच्याकडून २ लाख रुपयांचे ४ देशी बनावटीचे पिस्टल व ३ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
भुषण उत्तम मोहिते Bhushan Uttam Mohite (वय २३, रा/ ओम साई ऑर्चिड, पोकळे वस्ती, धायरी) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याचा साथीदार महेश कांबळे Mahesh Kamble (रा. गुजरवाडी, कात्रज) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस हवालदार दयानंद तेलंगे यांनी नर्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खंडणी विरोधी पथकातील सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जर्हाड, सहायक फौजदार फडतरे, पोलीस हवालदार कांबळे, तेलंगे, पोलीस अंमलदार पवार हे २८ जुलै रोजी मध्यरात्री अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी दयानंद तेलंगे यांना बातमी मिळाली की, एक जण देशी बनावटीची पिस्तुले विकण्यासाठी धायरी फाटा येथे येणार आहे. या बातमीची माहिती पोलीस निरीक्षक महेश सागडे यांना देण्यात आली. त्यांनी आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश दिले.
पोलीस पथक धायरी फाटा येथे गेले असता तेथे एक जण उभा असल्याचे दिसून आले. पोलिसांनी भुषण मोहिते याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ४ देशी बनावटीचे पिस्टल व ३ जिवंत काडतुसे मिळून आली. त्याच्यावर नांदेडसिटी पोलीस ठाण्यात यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे. त्याच्याकडे पिस्टलबाबत चौकशी केल्यावर त्याने व त्याचा मित्र महेश कांबळे हे दोघे मिळून प्रयागराज येथे गेले होते. प्रयागराज ते मिर्झापूर रोडवरील गावातून त्यांनी विक्रीसाठी ४ पिस्टल घेऊन आले होते. नर्हे पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत.
