Toxic Liquor in Pune | अवैध मिथेनॉल पुरवठ्यामुळे गंभीर घटना; एफडीएच्या नियंत्रणावर प्रश्नचिन्ह ! फुगेवाडीत चोवीस तासांत आठ जणांचा मृत्यू, गावठी दारू प्राशन केल्याने मृत्यू झाल्याची चर्चा; पोलिसांकडून नकार
Toxic Liquor in Pune | पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी परिसरात अवघ्या २४ तासांत आठ जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी सात जणांचा तर बुधवारी रात्री एका व्यक्तीचा मृत्यू झाला. याच परिसरातील आणखी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
या मृत्यूमागे गावठी दारूचे सेवन कारणीभूत असल्याची चर्चा परिसरात सुरू असली तरी पोलिसांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. प्राथमिक तपासात काही मृतांमध्ये अस्वस्थता, चक्कर येणे, तोंडातून फेस येणे, गुदमरणे आणि हृदयाचे ठोके मंदावणे अशी समान लक्षणे आढळल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, एका मृत व्यक्तीच्या पोटात मद्य आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली असली तरी सर्व मृत्यूंचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन आणि वैद्यकीय अहवालानंतरच वस्तुस्थिती समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून इतक्या मोठ्या प्रमाणावर मृत्यू होऊनही उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल न झाल्याने नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “पांडुरंग सदाशिव फुगे (वय ५७), विजय प्रकाश राठोड (वय ३१), राजेंद्र प्रकाश राठोड (वय ३४), राजेश राजपूत (वय ५१), अकबर पठाण (वय ५२), आनंद पांडुरंग देसाई (वय ६०), आनंद काशीनाथ निकाळजे (वय ७०, सर्व रा. फुगेवाडी) यांचा गुरुवारी मृत्यू झाला. बाबा शेख (वय ४२, रा. फुगेवाडी) यांचा बुधवारी (ता. २७) रात्री मृत्यू झाला.
पुणे जिल्ह्यात उघडकीस आलेल्या अवैध गावठी दारू प्रकरणात मिथेनॉलच्या अनियंत्रित पुरवठ्यामुळे गंभीर घटना घडल्याची बाब समोर आली आहे. मिथेनॉलच्या विक्री व पुरवठ्यावर पुरेसे नियंत्रण नसल्याने हा प्रकार घडल्याची चर्चा असून, अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, उत्पादन शुल्क विभागाच्या तत्पर कारवाईमुळे या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे याला अटक करण्यात आली. त्यानंतर वानखेडेने ज्या-ज्या ठिकाणी दारूचा पुरवठा केल्याची माहिती मिळाली, त्या सर्व ठिकाणी उत्पादन शुल्क विभागाने छापे टाकून संशयित आरोपींना ताब्यात घेतले आणि पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यामुळे आणखी मोठा अनर्थ टळल्याचे मानले जात आहे.
प्राथमिक तपासानुसार, उरुळी कांचन पोलिस ठाण्याच्या हद्दीत गावठी दारूची निर्मिती करण्यात आली होती. या दारूमध्ये योगेश वानखेडे याने सुमारे २१५ लिटर मिथेनॉल मिसळल्याचा आरोप आहे. त्यानंतर ही दारू पुणे शहरासह पिंपरी-चिंचवडमधील विविध दारू अड्ड्यांवर वितरित करण्यात आल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून संबंधित यंत्रणांकडून पुरावे आणि पुरवठा साखळीची सखोल चौकशी केली जात आहे.
