Pune Cyber Crime News | ना ओटीपी दिला, ना कोणतीही फाईल डाऊनलोड केली, तरी त्यांच्या खात्यातून सायबर चोरट्यांनी केले पावणे तीन लाख लंपास, पोलिसांनी तब्बल 9 महिन्यांनी घेतली तक्रारीची दखल

Pune Cyber ​​Crime News | Even though he neither gave OTP nor downloaded any file, cyber thieves looted Rs. 3.5 lakh from his account, police took cognizance of the complaint after 9 months

पुणे : Pune Cyber Crime News |  एमएनजीएल च्या नावाने महिलेला फोन आला. तुमचे गॅसचे बील अपडेट झाले नाही, असे सांगितले. त्यांची वैयक्तिक माहिती घेतली. त्यांना १० रुपये भरण्यास सांगितले. परंतु, त्यांनी पैसे भरले नाही. त्यांना बँकेची माहिती दिली नाही़ तरी त्या दिवशी त्यांच्या बँक खात्यातून १० रुपये कट झाले. त्यांनी त्याला फोन करुन विचारल्यावर त्याने तुमचे गॅस कनेक्शन अपडेट होईल, त्यानंतर तुम्ही केव्हाही पैसे भरु शकता, असे सांगण्यात आले. त्यानंतर २ दिवस काहीही झाले नाही. तिसर्‍या दिवशी त्यांच्या बँंक खात्यातून लागोपाठ ६ व्यवहार होऊन २ लाख ७१ हजार रुपये काढून घेतले गेले. कोणताही ओटीपी शेअर केला नाही, की कोणतीही फाईल डाऊन लोड केली नाही की कोणाला बँक खात्याची माहिती दिली नसताना एका ज्येष्ठ सेवानिवृत्त महिलेची फसवणूक झाली. सायबर पोलिसांकडे त्यांनी तातडीने तक्रार केली. त्याची आता ९ महिन्यांनी दखल घेण्यात आली. चतु:श्रृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेला १४ ऑगस्ट रोजी चालु महिन्यांचे गॅसचे बिल हे अपडेट झाले नाही, तात्काळ मला एमएनजीएलच्या ऑफिसमध्ये कॉल करा, असे मेसेज आला. त्यामध्ये एक नंबर होता. त्यांनी त्यावर कॉल केला. गॅसचे बील भरले असल्याबाबत सांगितले. त्याने त्यांना १० रुपये भरण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी पैसे भरण्यासाठी गुगल पे किंवा फोन पे करण्यास नकार दिला. तो वारंवार बँकेची माहिती विचारत होता. तेव्हा त्यांनी फोन  कॉल कट केला. त्यांनी कोणतीही माहिती दिली नसताना त्यांच्या मोबाईलवर लिंक असणार्‍या अक्सिस बँक व स्टेट बँकेचे ओटीपी येण्यास सुरुवात झाली. त्यांनी तातडीने फोन बंद केला. त्यानंतर त्यांना १० रुपये कट करण्यात आल्याचा मेसेज आला.

काही वेळाने त्यांना एका नंबरवरुन फोन आला, तुमचे १० रुपये कट करुन घेतले असून आता तुमचे गॅस कनेक्शन अपडेट होईल, त्यानंतर तुम्ही केव्हाही पैसे भरु शकता, असे सांगण्यात आले. त्यांनी मला न विचारता पैसे का कट करण्यात आले, असे विचारले. आणखी पैसे कट झाले तर तक्रार करेन, असे सांगितले. त्यानंतर १५ व १६ ऑगस्ट रोजी त्यांच्या बँक खात्यातून पैसे कट झाले नाही. १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी त्यांनी खरेदीसाठी ऑनलाईन पैसे दिले. त्या पाठोपाठ त्यांना त्यांच्या बँक खात्यातून पैसे कट केल्याचे मेसेज येऊ लागले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या खात्यातील शिल्लक रक्कम तातडीने पतीच्या खात्यात ट्रान्सफर केली. परंतु, काही वेळात त्याही जॉईंट खात्यातून सायबर चोरट्यांनी पैसे काढून घेऊन त्यांची २ लाख ७१ हजार रुपयांची फसवणूक केली. त्यांनी तातडीने सायबर पोलिसांकडे ऑनलाईन तसेच सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आता ९ महिन्यांनी पोलिसांनी त्यांच्या तक्रार अर्जाची दखल घेतली आहे. चतु:श्रृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक ननवरे तपास करीत आहेत.

त्यांच्या बँक खात्यातून पैसे गेल्यानंतर त्यांनी बँकेत तक्रार केली. तेव्हा बँकेने त्यांच्या खात्यात सायबर चोरट्यांनी लांबविलेली रक्कम पुन्हा टाकली. त्यांना ही रक्कम तुमच्या खात्यात पाठविली आहे. पण, सायबर पोलीस तपास करतील तोपर्यंत या रक्कमेला हात लावू नका, असे सांगितले. त्यानंतर २ महिन्यांनी जशी रक्कम टाकली, तशीच ती काढून घेतली. आता बँक पोलिसांकडे बोट दाखवते. पोलिसांनी आतापर्यंत त्यांची दखल घेतली नाही.

त्यांनी एमएनजीएल कंपनीच्या कार्यालयात जाऊन तुमच्या नावाने फसवणुक होते, असे सांगितले़ तर तेथील अधिकार्‍याने चोरटे तुमच्याशी कोणत्या भाषेत बोलत होते. त्यांनी हिंदी सांगितल्यावर ते म्हणाले, महाराष्ट्रात सर्वत्र मराठी वापरली जाते, असे सांगून हात वर केले. त्याचवेळी त्यांच्या कार्यालयातील किमान १५ जण हिंदीमध्ये लोकांशी बोलत असल्याचे फिर्यादी महिलेच्या लक्षात आले.

You may have missed