Pune Police News | पुणे : आरोपींची धिंड आणि सार्वजनिक अपमान थांबवा; पोलीस आयुक्तांचे सर्व पोलीस ठाण्यांना आदेश
पुणे : Pune Police News | भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील एका प्रकरणातील अल्पवयीन आरोपींची कथित धिंड काढणे आणि अपमानास्पद वागणूक दिल्याच्या घटनेनंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व पोलीस ठाणे, शाखा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना कठोर निर्देश जारी केले आहेत.
या घटनेची राज्य मानवी हक्क आयोगाने गंभीर दखल घेत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे. आरोपींना कथित अपमानास्पद वागणूक दिल्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
पुणे पोलीस आयुक्तालयाने जारी केलेल्या सविस्तर परिपत्रकात सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग (NHRC) आणि महाराष्ट्र पोलीस महासंचालकांच्या विविध आदेशांचा संदर्भ देण्यात आला आहे.
परिपत्रकानुसार, कोणत्याही आरोपीची धिंड काढू नये किंवा त्याचा सार्वजनिक अपमान होईल असे कोणतेही कृत्य करू नये.
आरोपीला उठाबशा काढायला लावणे, वाहनावर उभे किंवा बसवून फिरवणे, दोरी किंवा साखळीने बांधणे अथवा कोणत्याही प्रकारची अपमानास्पद वागणूक देण्यास स्पष्ट मनाई करण्यात आली आहे.
आरोपीला अटक केल्यानंतर न्यायालयासमोर हजर करेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS), महाराष्ट्र पोलीस मॅन्युअल आणि न्यायालयीन निर्देशांनुसारच राबवावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या डी. के. बसू विरुद्ध पश्चिम बंगाल सरकार या ऐतिहासिक निकालातील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणेही बंधनकारक करण्यात आले आहे.
या सूचनांचे उल्लंघन झाल्यास संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाची तसेच आवश्यक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही परिपत्रकात देण्यात आला आहे.
