Pune Crime News | MBBS ला अॅडमिशन मिळवून देण्याच्या नावाखाली जुळ्या मुलींची केली फसवणूक; Eduvio कंपनीच्या काऊंसिलरसह संचालकावर गुन्हा दाखल, देशभरात शेकडोंची फसवणूक
पुणे : Pune Crime News | जुळ्या मुलींना एम बी बी एस ला अॅडमिशन मिळवुन देतो, असे सांगून मुर्तिजापूरच्या पालकांची ५ लाख रुपयांची फसवणूक करणार्या Eduvio एड्युव्हिओ कंपनीचे काऊन्सलर व संचालकांवर विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Eduvio एडुव्हिओ कंपनीचे काऊन्सलर रोनित सर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अरगटपा, अरविंदराव ऊर्फ अदित्य कुमार, अदित्य देशमुख अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मुर्तिजापूर येथील एका ५१ वर्षाच्या पालकांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Eduvio Learning solutions pvt ltd एड्युव्हिओ लर्निंग सोल्युशन्स ही हैदराबाद स्थित एक शिक्षण सल्लागार संस्था आहे. भारतात एमबीबीएस प्रवेशासाठी सहाय्य करण्यात विशेषज्ञ आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या एका तपासात बनावट प्रवेशपत्रांद्वारे २ कोटी ३५ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कमेची फसवणूक केल्याचा एड्युव्हिओ कंपनीवर आरोप आहे. मॅनेजमेंट कोट्यातून एमबीबीएस ला प्रवेश देण्याच्या नावाखाली फसवणूक करण्यात आली आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये प्रवेशावरुन फसवणूक झाल्याचे गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना दोन जुळ्या मुली आहेत. दोन्ही मुलींचे १२ वी चे शिक्षण झाले. त्यांना एम बी बी एस ला प्रवेश घेण्यासाठी पुण्यात राहणार्या रोनित सर यांच्याशी संपर्क केला. त्यांनी eduvio एड्युव्हिओ कंपनीबाबत माहिती दिली. त्यावरुन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरगटपा अरविंदराव ऊर्फ अदित्य कुमार/ अदित्य देशमुख) यांच्याशी मोबाईलवरुन संपर्क साधला. त्यांनी eduvio Learning solutions pvt ltd कंपनीच्या नावाने एच डी एफ सी बँक खात्यात प्रत्येकी अडीच लाख असे ५ लाख रुपये भरण्यास सांगितले.
२९ डिसेंबर २०२५ रोजी बँकेत पैसे भरले़ त्यानंतर ५ मार्च २०२६ रोजी दोन्ही मुलींच्या प्रवेशाबाबत रोनित सर यांच्याकडे विचारपूस केल्यावर त्यांनी एड्युव्हिओ कंपनीचे सीईओ यांनी भारतातील १०० हून अधिक पालकांची फसवणूक केली आहे. हैद्राबाद येथे गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले. कंपनीचे काऊन्सलर रोनित सर यांनी तुमचे पैसे परत करतो, असे वारंवार सांगितले. मात्र पैसे परत केले नाही. हैद्राबाद येथील पेठ बशीराबाद पोलीस ठाण्यात अशा प्रकारे बरेच विद्यार्थी व पालकांची पैसे घेऊन फसवणूक केल्याबाबत गुन्हे दाखल झाल्याने आपलीही फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. फिर्यादी यांनी मुर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तो विमानतळ पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
