Pune Crime News | बँकेचे व्याज परवडत नसल्याने खासगी सोनाराकडे दागिने ठेवले गहाण; सोनार 17 तोळ्याचे दागिने घेऊन झाला फरार, दोघांवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | आयसीआयसी बँकेत सोन्याचे दागिने गहाण व्यवसायासाठी पैसे घेतले होते. या बँकेचे व्याज परवडत नसल्याने तेथून गहाण ठेवलेले दागिने काढून महिलेने ते कुमठेकर रोडवर सोन्याचे दुकान असलेल्या सराफाकडे दागिने गहाण ठेवून त्याच्याकडून पैसे घेतले. या सोनाराने दुकान बंद करुन तो पळून गेला. नर्हे पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सोनार योगेश मोहन जाधव Yogesh Mohan Jadhav (वय ३५, रा. बुधवार पेठ) आणि राजेश बाळासाहेब घारे Rajesh Balasaheb Ghare (वय ३३, रा. सोमेश्वर अपार्टमेंट, वडगाव बुद्रुक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत नांदेड सिटी येथे राहणार्या एका महिलेने नर्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ८ जानेवारी २०२२ ते आतापर्यंत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला यांचा व्यवसाय आहे. त्यांना २०२१ मध्ये पैशांची गरज असताना त्यांनी त्यांच्या आईने २०१० मध्ये लग्नात दिलेले १७ तोळे दागिने (सध्याच्या बाजारभावानुसार २५ लाख रुपये) आयसीआयसीआय बँकेत गहाण ठेवले होते. त्याचे व्याज पण त्या देत होत्या. त्यानंतर त्यांना परत आणखी पैशांची गरज होती. त्यांना बँकेचे व्याज परवडत नव्हते. त्यांनी हे राजेश घारे याला सांगितले. त्याने जी एम जाधव सराफ ज्वेलर्स (रा. बुधवार पेठ, अक्कलकोट स्वामीच्या मठाशेजारी) येथे योगेश जाधव या सोनाराची ओळख करुन दिली. त्यांना घेऊन त्या आयसीआयसीआय बँकेत गेल्या. त्यांनी बँकेमध्ये ठेवलेले १७ तोळे सोन्याचे दागिन काढून घेतले. राजेश घारे याच्या मध्यस्थीने योगेश जाधव याला दिले. त्याची त्याने पावती दिली. १७ तोळे सोन्याची तेव्हा अंदाजे किंमत ८ लाख रुपये होत होती. त्यांना बँकेत भरण्यासाठी ५ लाख ६० हजार रुपयांची आवश्यकता होती. ती रक्कम योगेश जाधव याने दिली. या रक्कमेचा महिना १५ हजार रुपये व्याज राजेश घारे याला त्या देत होत्या.
अशा प्रकारे जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२३ एकूण ३ लाख ६० हजार रुपये इतकी रक्कम त्यांनी दिली. ऑक्टोंबर २०२२ मध्ये त्यांचा व्यवसाय चांगल्या प्रकारे सुरु झाल्यामुळे त्यांच्याकडे पैसे येत होते. त्यामुळे ऑक्टोंबर २०२२ पासून त्या तारण ठेवलेले सोने परत घेण्याबाबत राजेश घारे याला सांगत होत्या. तो प्रत्येक वेळी टाळाटाळ करत होता. हे सोने योगेश जाधव याच्याकडे आहे. तो देईल, असे सांगत असे. त्यानंतर राजेश घारे याने त्यांना सांगितले की, योगेश जाधव याने त्याचे सोन्याचे दुकान बंद करुन तो पळून गेला आहे. त्यावर त्या व राजेश घारे हे त्या सोनाराच्या दुकानात जाऊन खात्री केली असता तो त्याचे दुकान बंद करुन पळून गेल्याचे समजले. योगेश जाधव याच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचा फोन लागू शकला नाही. दोघांनी संगनमत करुन त्यांचा विश्वासघात करुन १७ तोळे सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक केल्याची त्यांनी आता फिर्याद दिली आहे.
योगेश जाधव याने आणखी काही जणांची फसवणूक केली असण्याची शक्यता आहे. पोलीस उपनिरीक्षक अमोल मालुसरे तपास करीत आहेत.
