Pune Crime News | नोकरीसाठी परदेशात पाठविण्याच्या नावाखाली महिलेची पोर्तुगालमध्ये बिअर शॉपी विक्रेत्याला वेश्या व्यवसायासाठी केली विक्री; विमाननगरमधील प्लेसमेंट शॉपमधील धक्कादायक प्रकार
पुणे : Pune Crime News | परदेशात सुपरमार्केटमध्ये नोकरी देण्याच्या आमिषाने महिलेकडून 11 लाख रुपये घेऊन तिला पोर्तुगालमध्ये एका बिअर विक्रेत्याला वेश्या व्यवसायासाठी विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महिलेने तेथून आपली सुटका करुन घेऊन भारतात परत आल्यानंतर आता विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ही घटना विमाननगर येथील फिनिक्स मार्केटसिटी (Phoenix Marketcity) येथील यु जी ५ या कार्यालयात व पोतुगार्ल येथे १ डिसेंबर २०२५ ते १ जुलै २०२६ दरम्यान घडला आहे. याबाबत नागपूर येथील एका २८ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रतिमा भाटी, अमितकुमार झा, अजहर शेख, कपिल मिश्रा (सर्व रा. पुणे), तसेच वामसि, चैतन्य, हिम्मतसिंग (सर्व रा. पोर्तुगाल) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या महिलेला पोर्तुगालमध्ये ज्या बिअर विक्रेत्याला विकले होते. त्याच्या घरात आणखी दोन महिलांना ठेवण्यात आले असून त्यातील एक राजस्थानमधील व दुसरी हरियाणा येथील असून त्यांच्याकडून बिअर शॉपीमध्ये काम करावयास सांगून मालकाला खुश करायला लागत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर येथील ही महिला इंस्टाग्रामवर नोकरी शोधत होती. त्यादरम्यान डिसेंबर २०२५ मध्ये यु जी ५, फिनिक्स मार्केटसिटी, ईस्ट कोर्ट, क्लोव्हर पार्क, विमाननगर या कंपनीचे वी मायग्रेट(we migrate) या इन्स्टाग्रामचे पेजवर मुलांना परदेशात व्हिसा लागल्याने सेलिब्रेशनचा व्हिडिओ दिसला. त्यांनी संपर्क केल्यावर त्यांना पुण्यात बोलविले. तेथे प्रतिमा भाटी, अजहर शेख, कपिला मिश्रा यांची भेट झाली. प्रतिमा भाटी हिने आम्ही पाठविलेली मुले नेदरलँड, पोर्तुगाल, स्पेन, डेनमार्क आणि पोलंड येथील चॉकलेट कंपनीमध्ये वर्कर, सुपर मार्केटमध्ये कॅशियर व अकाऊंटंट असे जॉब असून दरमहा दीड लाख रुपये पगार, आठ तास काम व आठवड्यातून २ दिवसाची सुट्टी, ३ वर्षांसाठी वर्क परमिट असेल, असे जॉब प्रोफाईल सांगितले. यासाठी ११ लाख रुपये खर्च येईल असे सांगितले. त्या तयार असल्याने त्यांच्याकडून टप्प्या टप्प्याने पैसे घेतले. त्यांनी २४ मार्च २०२६ रोजी त्यांना परदेशात जॉब मिळाल्याचे पुण्यातील कार्यालयात सेलिब्रेशनसाठी बोलावले. त्यांच्याकडून जॉब रिलेटेडच्या कागदपत्रावर सह्या घेतल्या. त्याची कॉपी त्यांना देण्यात आली नाही. त्यानंतर त्या २१ मे २०२६ रोजी मुंबई – अबुधाबी – मेडरिड (स्पेन) असा प्रवास केला. २१ मे रोजी रात्री त्या स्पेनला पोहचल्या. तेथे अनिलचा कॉल आला. तेथे तुला वामसि हा मुलगा पिक करेल, असे सांगितले.
वामसिने दुसर्या दिवशी जाणुनबुजून उशीर केल्याने पोर्तुगालला जाणारी बस चुकली. त्यामुळे ते दुपारच्या बसने रात्री १२ वाजता पोर्तुगालला पोहचले. तेथे वामसिचा मित्र चैतन्य हा त्यांना घ्यायला आला. तेथून ते हिम्मतसिंग नावाच्या पंजाबीच्या घरी अज्ञात स्थळी घेऊन गेले. त्यांनी फिर्यादी यांचा पासपोर्ट हिसकावुन घेतला. २ दिवस रुममध्ये डांबुन ठेवले. त्यांच्याकडून ४० हजार रुपये घेतल्यानंतर पासपोर्ट परत दिला. त्यानंतर एका माणसाबरोबर ओदिमेरा गावात जावे लागेल, तेथे तुझे कॉलेजचे अॅडमिशन व स्टुडंट टीआरसी होईपर्यंत तेथेच रहावे लागेल व तुला सुपर मार्केटमध्ये कॅशियरचा जॉब मिळेल, असे अनिल याने त्यांना सांगितले. ओदिमेरा येथे त्यांना दोन मुलींबरोबर एका घरात ठेवले. त्यात एक राजस्थानी व दुसरी हरियाना येथील होत्या. दुसर्या दिवशी घरमालकाने २६ मे रोजी त्यांना सुपर मार्केट दुकानाच्या नावाखाली त्याच्याच बिअर शॉपीमध्ये कामासाठी पाठविले. ही बाब त्यांनी अनिलकुमार याला सांगितल्यावर त्याने स्टुंडट टिआरसी मिळेपर्यंत अॅडजेस्ट करण्यास सांगितले.
त्यानंतर २७ जून २०२६ रोजी या बिअर शॉपीच्या मालकाने त्याचे घरी कामास पाठविले. तेव्हा अनिलकुमार याने फोन करुन फिर्यादी यांनी मालकाला इम्प्रेस करुन सर्व प्रकारे खुश ठेवावे लागेल, असे सांगितले. ही बाब मी अनिलकुमार याला सांगितल्याचे मालकाला माहिती पडले. त्यावर तो फिर्यादीवर चिडला व म्हणाला, मी प्रतिमा भाटी व त्यांचे इतर साथीदारांना पैसे देऊन तुला विकत घेतलेले आहे. तुला इथे नोकरीकरीता पाठविलेले नसून तुला मी जे करण्यास सांगेल ते तुला करावे लागेल व मला खुश ठेवावे लागेल, असे सांगितले. फिर्यादी त्यांनी ही बाब त्यांच्यासोबत असलेल्या दोन्ही मुलींना सांगितली असता त्यांनी ही तुला मालक सांगेल, त्या व्यक्तीबरोबर वेश्या व्यवसायाकरीता जावे लागेल, असे सांगितले. त्यांनी मी तयार असल्याचे सांगितले. त्यानंतर पतीला फोन करुन आपली फसवणूक झाल्याचे सांगून घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर २९ जून २०२६ रोजी पहाटे ३ वाजता त्या ठिकाणाहून निघून बसने जांबुजीरा येथे आल्या. तेथुन लिजबान, मॅडरीड (स्पेन) येथे आल्या. त्या दिवशी त्या बसस्टॉपवरच थांबल्या. त्यानंतर ३० जून रोजी रात्री तेथेच असलेल्या होस्टेलमध्ये राहिल्या.
तेथून मॅडरीट ते दोहा ते दिल्ली असा विमानाने प्रवास केला. ३१ जून रोजी त्या दिल्लीत पोहचल्या. त्यांचा पती दिल्लीला आला. तेथून त्या नागपूरला आल्या. प्रतिमा भाटी हिने पासपोर्ट पाठव असा ईमेल केला. या नंतरही अनिलकुमार याने व्हॉटसअॅप कॉल करुन ३ लाख रुपयांची मागणी करुन मालटा येथे नोकरी लावतो, असे सांगून पैसे दिले नाही तर तुझ्या नवर्यावर विनयभंगाची केस लावून अथवा त्याला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. त्यामुळे तिची मनस्थिती ठीक नसल्याने त्यांनी तेव्हा तक्रार दिली नाही. आता पुण्यात येऊन गुन्हे शाखेत पोलिसांची भेट घेऊन त्यांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
