Toxic Liquor in Pune | विषारी दारू पिऊन पुण्यात 5 जणांचा मृत्यु; हडपसरमधील मंत्री मार्केटमधील दारु गुत्त्यावरुन त्यांनी दारु पिल्याचा संशय

Toxic Liquor in Pune | 5 people died in Pune after consuming toxic liquor; It is suspected that they consumed liquor from a liquor store in Mantri Market in Hadapsar

अवैध मिथेनॉल पुरवठ्यामुळे गंभीर घटना; एफडीएच्या नियंत्रणावर प्रश्नचिन्ह; उत्पादन शुल्क विभागाची तत्परता अन् वानखेडेला ताब्यात घेतल्यामुळे पुढच्या घटना टळल्या

पुणे : Toxic Liquor in Pune | फुगेवाडी येथील विषारी दारुचे लोण पुण्यातही पसरले असून हडपसर परिसरातील ५ जणांचा विषारी दारु पिल्याने मृत्यु झाल्याचे समोर आले आहे.

याबाबत अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितले की, विषारी दारु पिल्याने हडपसर परिसरातील ५ जणांचा मृत्यु झाल्याचे आताच निश्चित झाले आहे. हडपसर पोलीस ठाणे परिसरातील ३ आणि काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोघांचा समावेश आहे. विषारी दारु पिल्याने नागरिकांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी मिळाली. त्यानंतर चौकशी सुरु करण्यात आली. त्यात पहाटेपर्यंत ५ जणांचा मृत्यु झाल्याचे समजले आहे. हडपसर येथील मंत्री मार्केट परिसरातून या सर्वांनी दारू पिल्याची माहिती त्यांचे नातेवाईक सांगत आहेत. त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.

राहुल शरद क्षीरसागर (वय ४५, रा. पांढरे मळा, हडपसर), विजय भुकुरलाल शर्मा (वय ४५, रा. पांढरे मळा, ससाणेनगर, हडपसर), अरुण डाडर (रा. हडपसर), अशोक रमेश चव्हाण (रा. काळेपडळ), विजय भुकुरलाल शर्मा (रा. पांढरे मळा, ससाणेनगर, हडपसर) अशी विषारी दारु पिऊन मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत.

फुगेवाडी आणि हडपसर परिसरात योगेश वानखेडे याने ही विषारी दारु पुरविल्याचे सांगितले जात आहे. ही घटना समोर आल्यानंतर योगेश वानखेडेला राज्य उत्पादन विभागाने ताब्यात घेतले असून पोलिसांकडे सुपूर्द केले आहे. योगेश वानखेडे याच्यावर यापूर्वीही हातभट्टीच्या दारुचा पुरवठा केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली होती.

शहरात अवैध धंदे बंद असल्याचा व त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येत असल्याचा पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वारंवार दावा केला आहे. दोन्ही शहरात घडलेल्या या विषारी दारुमुळे झालेल्या मृत्युने त्यांच्या दाव्याला मोठा धक्का बसला आहे.

अवैध मिथेनॉल पुरवठ्यामुळे गंभीर घटना; एफडीएच्या नियंत्रणावर प्रश्नचिन्ह

पुणे जिल्ह्यात उघडकीस आलेल्या अवैध गावठी दारू प्रकरणात मिथेनॉलच्या अनियंत्रित पुरवठ्यामुळे गंभीर घटना घडल्याची बाब समोर आली आहे. मिथेनॉलच्या विक्री व पुरवठ्यावर पुरेसे नियंत्रण नसल्याने हा प्रकार घडल्याची चर्चा असून, अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, उत्पादन शुल्क विभागाच्या तत्पर कारवाईमुळे या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे याला अटक करण्यात आली. त्यानंतर वानखेडेने ज्या-ज्या ठिकाणी दारूचा पुरवठा केल्याची माहिती मिळाली, त्या सर्व ठिकाणी उत्पादन शुल्क विभागाने छापे टाकून संशयित आरोपींना ताब्यात घेतले आणि पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यामुळे आणखी मोठा अनर्थ टळल्याचे मानले जात आहे.

प्राथमिक तपासानुसार, उरुळी कांचन पोलिस ठाण्याच्या हद्दीत गावठी दारूची निर्मिती करण्यात आली होती. या दारूमध्ये योगेश वानखेडे याने सुमारे २१५ लिटर मिथेनॉल मिसळल्याचा आरोप आहे. त्यानंतर ही दारू पुणे शहरासह पिंपरी-चिंचवडमधील विविध दारू अड्ड्यांवर वितरित करण्यात आल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून संबंधित यंत्रणांकडून पुरावे आणि पुरवठा साखळीची सखोल चौकशी केली जात आहे.

You may have missed