Pune Crime News | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो कार्यालयातून हटविल्याप्रकरणी मनसेचे अमित ठाकरे यांच्यासह 20 ते 25 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | शासकीय तंत्र निकेतन या संस्थेच्या कार्यालयात शिरुन तेथे असलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटविल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांच्यासह २० ते २५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत डॉ. राजेंद्र काशिराम पाटील (वय ५२, रा. डावी भुसारी कॉलनी, कोथरुड) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना गणेशखिंड रोडवरील शासकीय तंत्रनिकेतन मध्ये सोमवारी दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान घडली.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पक्षाचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा आज पुणे दौरा होता. ते या दौर्यांमध्ये विविध शिक्षण संस्थांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार सोमवारी दुपारी ते गणेशखिंड रोडवर शासकीय तंत्र निकेतनमध्ये आले होते. त्यांच्याबरोबर २० ते २५ कार्यकर्ते होते. त्यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर कार्यालयात विनापरवाना कार्यालयात शिरले. कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज, त्याच्या शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याच्या शेजारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे फोटो आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो कशाला असा सवाल कार्यकर्त्यांनी करुन मोदी यांचा फोटो काढून घेतला. फिर्यादी डॉ. राजेंद्र पाटील व इतर सहकारी यांना धमकावुन कार्यालयात थांबुन जोरजोरात घोषणा देऊन गोंधळ घातला आहे. अमित राज ठाकरे व त्यांच्यासोबतच्या २० ते २५ कार्यकर्त्यावर विनापरवाना प्रवेश करुन गोंधळ घातल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शितल जाधव तपास करीत आहेत.
