Pune PMC News | भाजपच्या नगरसेवकांचा महापालिका प्रशासनाच्या निधीवर डोळा; प्रशासनाने अर्धवट कामांसाठी ठेवलेल्या दीड कोटींच्या निधीच्या वर्गीकरणाचा दिला प्रस्ताव

Pune PMC News | BJP corporators keep an eye on the municipal administration's funds; administration proposes classification of 1.5 crore funds set aside for unfinished works

पुणे : Pune PMC News | महापालिकेत पुन्हा बहुमताने सत्तेत आल्यानंतर सातत्याने निविदांच्या घोळात अडकलेल्या भाजप नगरसेवकांनी पुढची पायरी गाठली आहे. अंदाजपत्रक सादर केल्यानंतर अवघ्या सहाच महिन्यांत महापालिका प्रशासनाने अर्धवट प्रकल्पांसाठी ठेवलेल्या निधीचेच वर्गीकरण करण्यासाठी प्रस्ताव दाखल करणन यास सुरूवात केली आहे.  या प्रस्तावावरून महापालिकेतील भाजपची सत्ता संशयाच्या भोवर्‍यात अडकली आहे.

स्थायी समितीच्या शुक्रवारी होणार्‍या स्थायी समितीपुढे  प्रभाग क्र. ३२ वारजे – पॉप्युलरनगर येथील भाजपचे नगरसेवक भारतभूषण बराटे आणि नगरसेविका सायली वांजळे यांनी हे वर्गीकरणाचे प्रस्ताव दिले आहेत. महापालिका प्रशासनाने स.नं. ११८ वारजे येथील यु.पी.एस.सी.चा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय, अभयासिका आणि कल्चर सेंटरच्या उर्वरीत कामासाठी १ कोटी रुपयांची अंदाजपत्रकात तरतूद केली आहे. या अभ्यासिकेचे काम मागील सहा सात वर्षांपासून सुरू असून ७० टक्के काम झाले आहे.  परंतू या दोन्ही नगरसेवकांनी या निधीचे वर्गीकरण याच प्रभागातील बॉक्स क्रिकेट, फुटबॉल ग्राउंडच्या उर्वरीत कामे व साहित्य खरेदीसाठी करण्याचा तसेच कुस्ती संकुलाचे उर्वरीत काम व साहित्य विकत घेण्यासाठीचा प्रस्ताव दिला आहे. यासोबतच प्रशासनाने या प्रभागात विविध ठिकाणी गरजेनुसार ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामासाठी तरतूद केलेल्या  निधीचे वर्गीकरण त्यांनी सुचविलेल्या ड्रेनेज लाईन दुरूस्तीसाठी करण्यासाठी सुचविले आहे.

प्रशासन अर्धवट कामे पुर्ण करण्यासाठी अंदाजपत्रकात निधीची तरतूद करते. या निधीचे वर्गीकरण केले जात नाही. मात्र, भाजपच्या नगरसेवकांनी प्रशासनाच्या निधीवरही हक्क सांगायला सुरूवात केल्याने महापालिकेच्या कारभाराची दिशा भरकटल्याचे दिसून येते. स्थायी समिती हे प्रस्ताव मंजूर करणार का? याची उत्सुकता वाढली आहे.