Pune Police Arrested Bangladeshi पुणे विमानतळावरून गुवाहाटीला पळून जाण्याच्या तयारीत असलेले तीन बांगलादेशी जेरबंद
पुणे : Pune Police Arrested Bangladeshi | पुणे विमानतळावरून गुवाहाटीला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन बांगलादेशी महिलांसह एका अल्पवयीन मुलाला खडक पोलिसांनी विमानतळ पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. शाहीनूर बेगम शेख, शागुरिका बेगम युलिया शेख आणि टोपू ऊर्फ मुराद अहमद शेख अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.
शहरात अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात पुणे पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दोन महिला आणि एक अल्पवयीन मुलगा पुणे विमानतळावरून गुवाहाटीला जाण्याच्या तयारीत आहेत.
माहिती मिळताच खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी तपास पथक विमानतळावर रवाना केले. विमानतळ पोलिस, सीआयएसएफ अधिकारी आणि त्यांच्या पथकाच्या मदतीने विमानतळ परिसरात सापळा रचण्यात आला. त्यानंतर तिघांनाही संशयावरून ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत त्यांनी आपण बांगलादेशातील बिगाराट जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगितले. तसेच ते सोलापूरहून पुण्यात आले होते आणि पुढे गुवाहाटीला जाण्याच्या तयारीत असल्याची कबुली दिली. पुढील कारवाईसाठी तिघांना विमान नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
दरम्यान, गेल्या दहा महिन्यांत परिमंडळ १ मधून ९७ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती उपायुक्त कृषिकेश रावले यांनी दिली. ही कारवाई वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
