Sandeep Khardekar | पु. ल. देशपांडे उद्यानाबाहेरील अतिक्रमण हटवा; वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय करा, संदीप खर्डेकर यांची मनपा आयुक्तांकडे मागणी

Sandeep Khardekar | Remove encroachments outside PL Deshpande Park; Find a permanent solution to traffic congestion, Sandeep Khardekar's demand to the Municipal Commissioner

पुणे : Sandeep Khardekar | सिंहगड रस्त्यावरील प्रसिद्ध पु. ल. देशपांडे उद्यानाबाहेरील अतिक्रमण, वाहतुकीची कोंडी आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांना निवेदन दिले आहे. उद्यानाबाहेरील अनियंत्रित विक्रेते, हातगाड्या आणि पथारीवाल्यांमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

खर्डेकर यांनी सांगितले की, सायंकाळच्या वेळेस पु. ल. देशपांडे उद्यानात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होते. पाच रुपये प्रवेश शुल्क आणि वाहनतळ शुल्क भरण्यासाठीही नागरिकांची रांग लागते. लहान मुले आणि कुटुंबांसाठी हे उद्यान आकर्षणाचे ठिकाण ठरत असले, तरी उद्यानात प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी एकच प्रवेशद्वार असल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.

मुख्य प्रवेशद्वारालगत रस्त्यावरच भेळ, पाणीपुरी, फुगे आणि इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या हातगाड्या व पथाऱ्या लावल्या जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यापूर्वी अनेकदा कारवाई होऊनही परिस्थिती जैसे थे असल्याचे स्थानिक नागरिक, उद्यान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी बोलताना लक्षात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बागेत येणाऱ्या नागरिकांना खाद्यपदार्थांची गरज असते, मात्र त्यासाठी शिस्तबद्ध व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे खर्डेकर यांनी सुचवले आहे. छत्रपती संभाजी महाराज उद्यानाच्या धर्तीवर उद्यानाच्या आत किंवा पदपथालगत नियोजनबद्ध पद्धतीने विक्रेत्यांची व्यवस्था करावी, जेणेकरून विक्रेत्यांचा रोजगारही अबाधित राहील आणि वाहतूक कोंडीही होणार नाही, अशी मागणी त्यांनी केली.

तसेच उद्यानासाठी स्वतंत्र प्रवेश आणि बाहेर पडण्याचे वेगवेगळे दरवाजे उपलब्ध करून दिल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असेही त्यांनी नमूद केले आहे. उद्यानासमोरील सिग्नल परिसरात यु-टर्न घेणारी वाहने आणि सिग्नल तोडणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांमुळेही कोंडीत भर पडत असल्याने वाहतूक पोलिसांसोबत संयुक्त पाहणी करून योग्य तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय, पु. ल. देशपांडे उद्यानाजवळील ‘कलाग्राम’ हा सुंदर प्रकल्प नागरिकांसाठी नियमित खुला ठेवावा, अशीही विनंती खर्डेकर यांनी केली आहे. सध्या हा प्रकल्प केवळ विशिष्ट उपक्रमांच्या वेळी खुला असतो; मात्र सुट्टीच्या काळात नागरिकांना तो पाहता आल्यास त्याचा चांगला उपयोग होईल, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

You may have missed