Pune Police News | पुणे : मंडळांनो, प्रेशर मीड वापराल तर जप्तीची कारवाई ! ध्वनिवर्धकांबाबत पोलिस आयुक्तांचा कडक इशारा; उत्सवात कर्कश्श आवाज नकोच
पुणे : Pune Police News | गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या उत्सवात कर्णकर्कश आवाजाला यंदा ‘नो एंट्री’ असणार आहे. ध्वनिवर्धकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्लाझ्मा स्पीकर आणि प्रेशर मीडसारख्या तीव्र आवाज करणाऱ्या उपकरणांवर बंदी राहणार असून नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित साउंड सिस्टीम थेट जप्त केली जाईल, असा स्पष्ट इशारा पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेत विविध विभागांचे अधिकारी, पोलीस प्रशासन आणि गणेश मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. उत्सव शांततेत, सुरक्षितपणे आणि उत्साहात पार पडावा यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
मंडळांच्या प्रतिनिधींनी काही निर्बंध शिथिल करण्याची मागणी केली असली, तरी ध्वनिप्रदूषणाबाबत पोलिसांनी ठाम भूमिका घेतली आहे. उत्सव साजरा करण्यास कोणताही विरोध नसला, तरी अतितीव्र आवाज करणारे DJ, प्लाझ्मा आणि प्रेशर मीड यांना परवानगी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
ध्वनिक्षेपक वापरताना निर्धारित डेसिबल मर्यादेचे पालन करणे मंडळांना बंधनकारक राहणार आहे. DJ मधील ‘बेस’ आणि ‘टॉप’च्या वापराबाबतही लागू नियमांच्या चौकटीत मर्यादा निश्चित करण्यात येणार आहेत.
गणेशोत्सव हा पुण्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा महत्त्वाचा भाग असल्याने उत्सवाचा आनंद घेताना ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाजात DJ वाजविल्याचे किंवा बंदी असलेली उपकरणे वापरल्याचे आढळल्यास संबंधित मंडळावर कारवाई करून साउंड सिस्टीम जप्त केली जाईल, असा इशाराही पोलीस प्रशासनाने दिला आहे.
