Pune Crime News | कंपनीतील स्टोअर डिपार्टमेंमधील कर्मचार्याशी संधान साधून बनावट इनव्हाईस तयार करुन कंपनीची 3 कोटी 30 हजारांची फसवणूक करणार्या तिघांवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | कंपनीतील स्टोअर डिपार्टमेंमधील कर्मचार्याशी संधान साधून बनावट इनव्हाईस तयार करुन कंपनीला मटेरियल पाठविले नसताना ते पाठविल्याच्या नोंदी करुन ३ कोटी ३० हजार रुपयांना गंडा घालणार्या तिघांवर पौड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत फॅक्टरी मॅनेजर अविनाश बाळासाहेब आडमुठे (वय ४२, रा. मोरवाडी, पिंपरी) यांनी पौड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अनिल श्रीमंत पवार Anil Shrimant Pawar (रा. शिंदेवाडी, मुळ रा. गौर गाव, देवधरा ता. कळंब, जि. धाराशिव), सरिता रोकडे, तेजश्री विचारे (रा. सिल्व्हर स्प्रिंग तलोजा, एमआयडीसी, तलोजा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना घोटावळे येथील प्रभा इंजिनिअरींग कंपनीमध्ये २०२३ ते १६ फेब्रुवारी २०२६ दरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे प्रभा इंजिनिअरींग कंपनीमध्ये फॅक्टरी मॅनेजर आहेत. त्यांच्या कंपनीची चार चाकी गाड्यांचे वायपर मोटार बनविणे आणि शिट मेटल्सचे पार्ट, जॅक आणि स्टेप्स बनविण्याचे काम करते. हे पार्ट तयार करण्यासाठी ते वेगवेगळ्या कंपनीकडून कच्चा माल मागवत असतात. त्यात तलोजा एमआयडीसीमधील बेटर इस्पात प्रा. लि. या कंपनीकडून वेगवेगळ्या जाडीचे व ग्रेडचे एच आर पी ओ शीटचा कच्चा माल २०२१पासून खरेदी करत आहे. कंपनीच्या स्टोअर डिपार्टमेंटमध्ये अनिल पवार हे टिम मेंबर म्हणून कामाला आहेत. त्यांच्याकडे कंपनीमध्ये जेवढे बाहेरुन आलेले मटेरियल आहे. त्याबाबत त्याच्या नोंदी घेऊन त्या बाबत चे सर्व रेकॉर्ड अदयावत ठेवणे व कच्चे मटेरिअलचे बिल अकाऊंट डिपार्टमेंटमध्ये सबमिट करणे आणि पार्टीचे पेमेंट झाले की नाही हे बघणे हे काम त्यांच्याकडे दिलेले होते.
डिसेंबर २०२५ मध्ये कंपनीमध्ये संपूर्ण महिन्यामध्ये बाहेरुन किती माल आला, किती माल वापरला गेला, किती माल स्क्रॅबमध्ये गेला आणि किती माल शिल्लक राहिला याबाबत त्यांनी सॉफ्टवेअरवर चेक केले. त्यात थर्ड पार्टी कडे जास्तीचा माल गेला असल्याचे निदर्शनास आले. तेव्हा त्यांनी संपूर्ण रेकॉर्ड चेक करायला चालू केले. त्यात पुशा मेटल्स कंपनीला भरपूर माल एक्स्ट्रा गेल्याचे दिसून आले. तसेच मालाचे बिल चेक करायला चालू केले. त्यात काही बिलांच्या सप्लयायर कंपनीच्या आणि आमच्या कंपनीच्या वजन काट्याच्या पावत्या नव्हत्या. ज्या सप्लायर कंपनीच्या वजन काट्याच्या पावत्या नव्हत्या, त्या सर्व बिल बेटर इस्पात प्रा. लि. कंपनीचे असल्याचे दिसून आले.
फिर्यादी यांनी कंपनीतील ही गडबड शोधून काढण्यासाठी एक वकीलाची नेमणूक केली. कंपनीतील तिघांना या वकीलाकडे पाठविले. तेव्हा तिघांपैकी ओंकार सोनवणे हा वकिलाकडे गेलाच नाही. तेव्हापासून तो कामावर आला नाही. त्यांनी बेस्टर इस्पात कंपनीने ५४६ टन एच आर पीओ शिटस च्या खोटे इनव्हाईस तयार करुन त्यावर शीटस आल्या व रिसीव्ह झाल्याच्या नोंदी केल्या. ते इनव्हॉईस अकाऊंट डिपार्टमेंटला दिले. तेव्हा अकाऊंट डिपार्टमेंटने ५४६ टन एच आर पी ओ शीटचे पैसे वेळोवेळी बेटर इस्पात कंपनीच्या खात्यावर पाठविले आहेत. आजच्या बाजार भावाप्रमाणे ३ कोटी ३० हजार रुपये इतकी फसवणूक केली. बेटर इस्पात कंपनीचे मालक सरीता रोकडे, तेजश्री विचारे आणि कंपनीत काम करणारे पर्चेस आणि डिस्पेंच हेड उत्तम विचारे आणि अनिल पवार यांनी सर्वांनी मिळून संगनमताने ही फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे़ बेटर इस्पात कंपनीचे मालक सरीता रोकडे, तेजश्री विचारे आणि उत्तम विचारे यांना कंपनीच्या मुंबई कार्यालयात बोलविले. तेथे त्यांनी अनिल पवार यांच्या सोबत मिळून प्रभा कंपनीला फेक बिले देऊन प्रभा कंपनीची फसवणूक केल्याचे सांगितले. पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी तपास करीत आहेत.
