Pune Rain News। सिग्नल बंद पडल्यावर भर पावसात कार्यकत्यांनी केले वाहतूक नियोजन; सेनापती बापट रोडवरील वेताळ बाबा चौकातील घटना
पुणे : Pune Rain News । दिवसभर सुरु असलेल्या पावसामुळे सेनापती बापट रोडवरील वेताळबाबा चौकात दुपारी सिग्नल बंद पडला. त्यामुळे एकच कोंडी झाली. तेव्हा तेथून जाणार्या कार्यकर्त्यांनी आपली वाहने बाजूला ठेवून भर पावसात भिजत वाहतूक नियोजन करुन वेताळ बाबा चौकातील वाहतूक सुरळीत केली.
वेताळ बाबा चौकातील सिग्नल दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास बंद पडला. तेव्हा चौकात वाहतूक पोलीस नव्हते. त्यामुळे चारही बाजूची वाहने एकाच वेळी पुढे जाण्याचा प्रयत्न करु लागल्याने चौकात मोठी कोंडी झाली होती. हे पाहून संतोष देसाई आणि स्वप्नील राऊत हे आपली वाहने बाजूला ठेवून चौकात उतरले. त्यांनी ही वाहतूक कोंडी सोडवली. जवळपास २ तास भर पावसात उभे राहून वाहतूक नियोजनाचे काम केले. या परिसरात अनेक शाळा असल्याने स्कुल बसची वाहतूक यावेळेत जास्त असते. वाहतूक पोलीस येईपर्यंत त्यांनी वाहतूक नियोजन केले. चौकातून जाणार्या लोकांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले. एका कारचालकाने त्यांच्या या कामाचा व्हिडिओ काढून तो पोस्ट केला. काही वेळातच तो व्हायरल झाला.
