Pune Rain Updates । डेंगळे पुलाखाली नदी पात्रात अडकलेल्या युवकाची सुटका

Pune Rain Updates | Rescue of a young man stuck in the riverbed under Dengle Bridge

पुणे : Pune Rain Updates । खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्यानंतर नदीतील पाणी पातळीत वाढ झाली. शिवाजीनगर भागातील डेंगळे पुलाखाली चेंबरजवळ अडकलेल्या युवकाची अग्निशमन दलाने सुटका केली. नदीपात्रात पाणी सोडल्यानंतर डेंगळे पुलाखाली असलेल्या चेंबरजवळ एक युवक अडकल्याची माहिती अग्निशमन दलाला दुपारी अडीचच्या सुमारास मिळाली. त्यानंतर कसबा पेठ अग्निशमन केंद्रातील समीर शेख, समित दळवी, गणेश लोणारे, प्रसाद नाणेकर, संतोष अरगडे, प्रतीक कुंभार, आतिश नाईकनवरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दोरी, शिडी, तसेच लाईफ जॅकेट अशा साधनांचा वापर करुन जवान खाली उतरले. शिवाजीनगर भागातील जीवरक्षक राजू काची हे बचाव कार्यात सहभागी झाले. पंधरा ते वीस मिनिटांत नदीपात्रात अडकलेल्या युवकाची सुटका करण्यात आली.

२२ वर्षाचा हा तरुण मानसिक आजार असून शिवाजीनगर पोलिसांनी त्याला पालकांच्या ताब्यात दिले असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी सांगितले.

You may have missed