Pune Rural Crime News | पुणे : करडे घाट गोळीबार प्रकरणी 6 आरोपी गजाआड; मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू
पुणे : Pune Rural Crime News | शिरूर-सातारा महामार्गावरील करडे घाटात झालेल्या गोळीबार आणि खून प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी सहा संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून, हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये आदित्य दीपक कांबळे Aditya Deepak Kamble (वय १९), अमन दस्तगीर पटेल Aman Dastagir Patel (वय २६), इरफान ऊर्फ विशाल जगन्नाथ पंदी Irrfan alias Vishal Jagannath Pandi (वय २४, सर्व रा. वाघोली, पुणे), पांडा बालाजी कांबळे Panda Balaji Kamble (वय २६, रा. तुकाई मळा, रामलिंग, शिरूर), सिद्धेश ऊर्फ बाळ्या तुकाराम शिंदे Siddhesh alias Balya Tukaram Shinde (वय २१, रा. बाबूराव नगर, शिरूर) आणि देवानंद शिवाजी चव्हाण Devanand Shivaji Chavan (वय २७, रा. मारुती आळी, शिरूर) यांचा समावेश आहे. अटक केलेल्या आरोपींना शिरूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ९ जूनपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास करडे घाटात एका मोटारीला धडक देऊन सहा जणांच्या टोळक्याने अंदाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारात विशाल सुनील काळे (वय ३१, रा. ढोरआळी, मुंबई बाजार, शिरूर) याचा मृत्यू झाला, तर केदार झाडगे (रा. कुंभार आळी, शिरूर) गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर शिरूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती.
घटनेची गंभीर दखल घेत विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल, अप्पर पोलिस अधीक्षक शिवकुमार आणि उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला गती देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर पोलिस निरीक्षक संदेश केंजळे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली चार विशेष तपास पथके स्थापन करण्यात आली.
शिरूर, पुणे आणि परिसरातील रेकॉर्डवरील गुंड, टोळीप्रमुख आणि संशयितांची धरपकड मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत ५० हून अधिक नामचीन गुंडांची चौकशी करण्यात आली. या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे सहा संशयितांना अटक करण्यात पोलिसांना यश आले.
दरम्यान, या हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार अद्याप पोलिसांच्या रडारवर असून त्याचा शोध सुरू आहे. करडे घाट गोळीबार प्रकरणाच्या तपासासाठी वरिष्ठ अधिकारी गेल्या तीन दिवसांपासून शिरूरमध्ये तळ ठोकून असून तपासाचा आढावा घेत आहेत.
