State Excise Department Pune | पुणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून शिरोली खुर्द येथे छापा; बनावट विदेशी मद्यासह 4.54 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, दोन जणांना अटक

State Excise Department Pune | Pune: State Excise Department raids Shiroli Khurd; Goods worth Rs 4.54 lakh including fake foreign liquor seized, two arrested

पुणे : State Excise Department Pune |  राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नारायणगाव पथकाने जुन्नर तालुक्यातील शिरोली खुर्द येथे मोठी कारवाई करत बनावट विदेशी मद्याचा साठा जप्त केला. या कारवाईत बनावट विदेशी मद्याच्या ३२९ बाटल्या, बनावट बुचे, कॅप्स, पॅकिंग साहित्य आणि मोटार असा एकूण ४ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये गोविंद शंकर जाधव Govind Shankar Jadhav (रा. निरगुडे, ता. जुन्नर) आणि भंगार व्यावसायिक रवींद्र शामराव माळी Ravindra Shamrao Mali (रा. म्हाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव) यांचा समावेश आहे. ही माहिती राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक शरद जाधव आणि दुय्यम निरीक्षक सौरभ आवटे यांनी दिली.

दुय्यम निरीक्षक सौरभ आवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बनावट विदेशी मद्य तयार करून त्याची विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार ३० मे २०२६ रोजी नारायणगाव विभागाच्या पथकाने जुन्नर-गणेशखिंड रस्त्यावरील गणेशखिंड येथे सापळा लावला. वाहन तपासणीदरम्यान आरोपी गोविंद जाधव याच्या मोटारीत चंदिगढ राज्य निर्मित लेबल असलेल्या बनावट विदेशी मद्याचा साठा आढळून आला.

गोविंद जाधव याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता शिरोली खुर्द येथील एका घरात इम्पिरियल ब्लू व्हिस्की, रॉयल स्टॅग व्हिस्की, यु के नं. १ व्हिस्की आदी ब्रँडच्या नावाने बनावट विदेशी मद्याचा साठा करून ठेवल्याचे उघड झाले. त्या ठिकाणी रिकाम्या बाटल्या, बनावट बुचे, कॅप्स, लेबल्स आणि इतर पॅकिंग साहित्यही आढळून आले.

प्राथमिक तपासात आरोपी गोविंद जाधव हा अहमदनगर येथून बनावट विदेशी मद्य आणत असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर तो भंगार व्यावसायिकांकडून रिकाम्या बाटल्या खरेदी करून त्यामध्ये मद्य भरत असे. बनावट बुचे आणि लेबलिंग करून या मद्याची विक्री केली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या बनावट मद्याची विक्री नेमकी कुठे केली जात होती, तसेच या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेंद्र देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त सागर धोमकर आणि अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

ही कारवाई निरीक्षक शरद जाधव, दुय्यम निरीक्षक सौरभ आवटे, समृद्धी निकम, सहाय्यक दुय्यम निरीक्षक दयानंद माने, जवान निलेश केदार, दिलीप केकरे, प्रियंका झांजरे आणि गणेश वाव्हळ यांच्या पथकाने केली.

You may have missed