Pune Temperature | प्रचंड उकाड्याने पुणेकर हैराण; तापमान 39 ते 40 अंशांवर, संध्याकाळीही उष्णतेची धग कायम
Pune Temperature | पुण्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा पारा सातत्याने वाढत असून शहरातील कमाल तापमान ३९ ते ४० अंश सेल्सिअसच्या घरात पोहोचले आहे. वाढत्या तापमानासोबत हवेतील प्रचंड उकाड्यामुळे पुणेकर अक्षरशः हैराण झाले असून, पूर्वी संध्याकाळी मिळणारा गारवाही आता गायब झाल्याचे चित्र आहे.
रविवारी सकाळपासूनच सूर्याने तीव्र रूप धारण केले होते. सकाळी नऊ वाजल्यापासूनच उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आणि दुपारपर्यंत परिस्थिती अधिकच तीव्र झाली. मुख्य रस्त्यांवर तुलनेने कमी वर्दळ दिसून आली, कारण नागरिकांनी उन्हाचा तडाखा टाळण्यासाठी घरात किंवा कार्यालयातच राहणे पसंत केले.
विशेष म्हणजे, संध्याकाळीही उष्णतेत कोणतीही घट झाली नाही. संथ वाऱ्यांसोबत येणाऱ्या गरम हवेच्या लाटांमुळे नागरिक घामाघूम झाले. रात्री उशिरापर्यंत उकाडा कायम राहिल्याने पंखे आणि एसी सुरू असूनही अनेकांना अस्वस्थता जाणवत होती.
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, अरबी समुद्राकडून येणारी आर्द्रता आणि स्थानिक हवामानातील बदल यामुळे उकाडा वाढल्याचे सांगितले जात आहे. पुढील दोन ते तीन दिवसही तापमानात फारसा बदल होणार नसून दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, डॉक्टरांनी नागरिकांना उष्माघात आणि डिहायड्रेशन टाळण्यासाठी भरपूर पाणी, लिंबूपाणी व ताक पिण्याचा सल्ला दिला असून, दुपारच्या वेळेत थेट उन्हात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.
रविवारचे कमाल तापमान:
शिवाजीनगर – ३९.२°C
कोरेगाव पार्क – ३८.८°C
वडगावशेरी – ३८.२°C
चिंचवड – ३७.९°C
पाषाण – ३७.२°C
हडपसर – ३६.९°C
