Pune Traffic Police | पुण्यात 1 हजार 317 बेवारस वाहनांचा होणार जाहीर लिलाव; मालकी हक्कासाठी 15 दिवसांची मुदत

Pune Traffic Updates

पुणे : Pune Traffic Police | शहरातील सार्वजनिक रस्ते, पदपथ आणि इतर ठिकाणी दीर्घकाळापासून पडून असलेल्या बेवारस वाहनांविरोधात पुणे वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. शहरातील विविध भागांतून हटवण्यात आलेली तब्बल १ हजार ३१७ दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहने हडपसरमधील रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया येथील समर्थनगर वाहन डम्पिंग यार्डमध्ये जमा करण्यात आली आहेत.

पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून पादचाऱ्यांच्या सुरक्षित हालचालींवरही परिणाम होत आहे. त्यामुळे संबंधित वाहनांचा जाहीर लिलाव करण्याची प्रक्रिया वाहतूक शाखेने सुरू केली आहे.

ही कारवाई महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ मधील कलम ८५ (१) अन्वये करण्यात येत आहे. ज्या नागरिकांना आपले वाहन बेवारस वाहनांच्या यादीत असण्याची शक्यता वाटत असेल, त्यांनी रामटेकडी येथील वाहन डम्पिंग यार्डमध्ये जाऊन वाहनांची पाहणी करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

संबंधित वाहनावर मालकी हक्क असल्यास, प्रसिद्धी पत्रकाच्या दिनांकापासून १५ दिवसांच्या आत संबंधित वाहतूक विभागाच्या पोलिस निरीक्षक किंवा सहायक पोलिस निरीक्षकांसमोर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा लागणार आहे.

निर्धारित मुदतीत वाहनाच्या मालकाने किंवा कायदेशीर हक्कदाराने मालकी सिद्ध केली नाही, तर महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ मधील कलम ८७ मधील तरतुदीनुसार संबंधित वाहने शासनाच्या स्वाधीन असल्याचे मानले जाईल. त्यानंतर त्या वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेने स्पष्ट केले आहे.

या कारवाईमुळे शहरातील रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागांवरील अडथळे कमी होऊन वाहतुकीला अधिक मोकळीक मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.