Pune Traffic Updates | पुणे: गणेश विसर्जनासाठी मोठे वाहतूक बदल; लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्त्यासह 17 प्रमुख रस्ते बंद, 24 सप्टेंबरच्या रात्रीपासून प्रमुख रस्त्यांवर नो-पार्किंग

Pune Traffic Updates | Pune: Major traffic changes for Ganesh immersion; 17 main roads including Laxmi Road, Chhatrapati Shivaji Maharaj Road, Bajirao Road closed, no-parking on main roads from the night of September 24

पुणे : Pune Traffic Updates | श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर वाहतूक पोलिसांनी मध्यवर्ती भागासह शहरातील विविध परिसरांसाठी मोठ्या प्रमाणावर वाहतूक बदल जाहीर केले आहेत. मुख्य विसर्जन मिरवणूक 25 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास सुरू होणार असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रस्ते बंद, वाहतूक वळविणे, नो-पार्किंग आणि पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे.

लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्त्यासह 17 मार्गांवर निर्बंध

मुख्य विसर्जन मिरवणुकीमुळे छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, गणेश रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, जंगली महाराज रस्ता आणि कर्वे रस्ता यांसह प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक टप्प्याटप्प्याने बंद केली जाणार आहे.

शिवाजी आणि लक्ष्मी रस्त्यावरील निर्बंध पहाटे 5 वाजल्यापासून सुरू होतील. टिळक रस्त्यावर सकाळी 9 पासून, बाजीराव, कुमठेकर, गणेश, केळकर आणि शास्त्री रस्त्यावर सकाळी 10 पासून, जंगली महाराज रस्त्यावर सकाळी 11 पासून तर कर्वे रस्त्यावर दुपारी 12 पासून वाहतुकीवर निर्बंध लागू होणार आहेत. हे बदल मिरवणूक संपेपर्यंत लागू राहतील.

याशिवाय फर्ग्युसन रस्ता, भांडारकर रस्ता, पुणे-सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, प्रभात रस्ता, बगाडे रस्ता आणि गुरुनानक रस्ता या मार्गांवरही निश्चित वेळेनंतर वाहतूक बंद केली जाणार आहे.

दहा ठिकाणी वाहतूक वळविणार

मिरवणूक सुरू झाल्यानंतर जंगली महाराज रस्त्यावरील झाशी राणी चौक, शिवाजी रस्त्यावरील काकासाहेब गाडगीळ पुतळा, मुदलियार रस्त्यावरील अपोलो टॉकीज-दरुवाला पूल, लक्ष्मी रस्त्यावरील संत कबीर पोलिस चौकी, सोलापूर रस्त्यावरील सेव्हन लव्हज चौक, सातारा रस्त्यावरील व्होल्गा चौक, बाजीराव रस्त्यावरील सावरकर पुतळा चौक, शास्त्री रस्त्यावरील सेनादत्त पोलिस चौकी, कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप आणि फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील गुडलक चौक येथून आवश्यकतेनुसार वाहतूक वळवली जाणार आहे.

वाहनचालकांसाठी कर्वे रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, सेनापती बापट रस्ता, गणेशखिंड रस्ता, आंबेडकर रस्ता, नेहरू रस्ता, शिवनेरी रस्ता, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता आणि लालबहादूर शास्त्री रस्ता यांचा समावेश असलेले पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

24 सप्टेंबर रात्रीपासून प्रमुख रस्त्यांवर नो-पार्किंग

24 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजल्यापासून मुख्य विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, शास्त्री रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता आणि फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता या प्रमुख मार्गांवर सर्वसामान्य वाहनांसाठी नो-पार्किंग लागू राहणार आहे.

खंडोजीबाबा चौक ते हॉटेल वैशालीला जोडणाऱ्या उपरस्त्याच्या सुमारे 100 मीटर परिसरातही पार्किंगला मनाई करण्यात आली आहे.

जड वाहनांना संपूर्ण शहरात 48 तास प्रवेशबंदी

विसर्जन काळात वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी 25 सप्टेंबरच्या मध्यरात्री 12.01 वाजल्यापासून 26 सप्टेंबर रात्री 12 वाजेपर्यंत, म्हणजेच एकूण 48 तास पुणे शहरात सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

सिंहगड रस्ता, धायरी आणि हडपसरमध्येही वाहतूक बदल

धायरी फाटा ते उंबऱ्या गणपती चौक या मार्गावरील वाहतूक 25 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते रात्री 12 पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. सिंहगड रस्त्यावरून वडगाव भाजी मंडईकडे जाणाऱ्या वाहनांसाठीही काही काळ निर्बंध राहतील. वाहनांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

केशवनगर, मुंढवा, ससाणेनगर आणि हडपसर परिसरातही विसर्जन मिरवणुकीनुसार एकेरी वाहतूक आणि तात्पुरते मार्गबदल करण्यात येणार आहेत.

वाहतूक पोलिसांनी नागरिकांना शक्यतो मुख्य विसर्जन मार्ग टाळावा, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा आणि पोलिसांनी निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

You may have missed