Maharashtra Weather Alert | महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन; 26 जिल्ह्यांना वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’

rain

पुणे :   Maharashtra Weather Alert | दक्षिण कोकणातून मान्सूनने महाराष्ट्रात अधिकृतरीत्या प्रवेश केला असून, तो लवकरच संपूर्ण राज्यभर सक्रिय होण्याची शक्यता आहे. मात्र, मान्सूनच्या सुरुवातीसोबतच राज्यात सध्या वादळी पावसाचे सावट निर्माण झाले आहे.

भारतीय हवामान विभागाने पुढील २४ ते ४८ तासांसाठी राज्यातील २६ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. यामध्ये प्रामुख्याने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकण किनारपट्टीच्या भागांसह पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश आहे. या सर्व भागांत विजांच्या कडकडाटासह आणि ताशी ३० ते ५० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि लातूरसह मराठवाड्यातील सर्वच ८ जिल्ह्यांमध्येही हवामान विभागाने वादळी पावसाचा इशारा दिला असून येथे उष्ण आणि ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो, तर धुळे, नंदुरबार आणि जळगाव भागात हवामान मुख्यत्वे कोरडे आणि उष्ण राहील, जेथे तापमान ३७ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात मात्र पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, पण उष्ण व दमट हवामानामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागू शकतो. हवामान विभागाने नागरिकांना विजा कडाडत असताना सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन केले आहे.

You may have missed