Rohit Pawar | भोंदूच्या सल्ल्याने पूजा? अजित पवार प्रकरणात रोहित पवारांचा गौप्यस्फोट; CID चौकशीची मागणी

Rohit Pawar | Pooja on the advice of a fraudster? Rohit Pawar's revelation in Ajit Pawar case; Demand for CID investigation

पुणे : Rohit Pawar | माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूला तीन महिने पूर्ण होत असताना, त्यांच्या मृत्यूपूर्वी घडलेल्या काही घटनांबाबत आमदार रोहित पवार यांनी सनसनाटी दावे करत नव्या चौकशीची मागणी केली आहे. भोंदू अशोक खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीतील एका स्थानिक नेत्याने अजित पवार यांच्या घराबाहेर तसेच शेतात पूजा केल्याचा आरोप त्यांनी केला.

प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, या प्रकरणातील खरातचा ‘अँगल’ सीआयडीने गांभीर्याने घेतलेला नाही. तो तपासात समाविष्ट करावा, यासाठी त्यांनी मागणी केली. काटेवाडी येथील घराजवळील शेतात असलेल्या विहिरीच्या परिसरात एका झाडाला बकरीचा बळी देऊन पूजा करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला असून, सध्या तेथे बकरीची हाडे आणि अवशेष आढळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

तसेच बारामतीतील एका स्थानिक नेत्याचे अशोक खरातसोबत सातत्याने संपर्क असल्याचे, तसेच काही आर्थिक व्यवहारही झाल्याची माहिती मिळाल्याचा दावा त्यांनी केला. अजित पवार यांच्या काटेवाडी व सहयोग येथील घरांबाहेरही अशाच प्रकारच्या पूजा करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

“आम्ही अंधश्रद्धा किंवा भोंदूगिरीवर विश्वास ठेवत नाही; मात्र या कृतीमागील हेतू काय होता, हा प्रश्न महत्त्वाचा आहे,” असे सांगत त्यांनी २७, २८ आणि २९ जानेवारीदरम्यान खरातच्या खात्यातील आर्थिक उलाढाल वाढल्याबाबतही शंका व्यक्त केली.

याशिवाय, काही दिवसांत पवार कुटुंबावर मोठा आघात होईल, असे भाकित खरातने केल्याची माहिती एका शेतकऱ्याने दिल्याचेही त्यांनी सांगितले. या सर्व बाबींची सखोल चौकशी सीआयडीमार्फत करण्यात यावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

You may have missed