Sandeep Khardekar | ‘पटवर्धन बाग टँकर पॉईंटवरील मीटर बंद; ‘मोफत पाणी’ पुरवठ्यावर प्रश्नचिन्ह’ – संदीप खर्डेकर
पुणे : Sandeep Khardekar | एरंडवण्यातील पटवर्धन बाग येथील टँकर पॉईंटवर गंभीर त्रुटी समोर आली असून, येथील पाण्याचा मीटर १६ डिसेंबर २०२५ पासून बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. या ठिकाणावरून पुणे महानगरपालिका विविध भागांमध्ये टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करते.
या टँकर पॉईंटवरून प्रभाग क्रमांक १०, ११, २९, ३०, ३१, ३२ आणि ३३ या मोठ्या परिसरात पाणी पुरवले जाते. मात्र, मीटर बंद असल्याने नेमके किती पाणी भरले गेले किंवा किती टँकर पाठवण्यात आले याचा अचूक हिशोब ठेवणे कठीण झाले आहे, असा सवाल क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी उपस्थित केला आहे.
काही वर्षांपूर्वीही अशाच प्रकारचा गैरप्रकार उघडकीस आला होता. तेव्हा गुप्तपणे केलेल्या पाहणीत रजिस्टरमध्ये १८ टँकरची नोंद असताना प्रत्यक्षात ५० टँकर भरले गेल्याचे आढळले होते. त्यानंतर सर्व टँकर पॉईंटवर मीटर बसविण्यात आले होते.
सद्यस्थितीत पुन्हा मीटर बंद असल्याने मनपाकडून पाणीपुरवठ्याचा हिशोब कसा ठेवला जातो, याबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, पाणीपुरवठ्यानंतर संबंधित सोसायटी किंवा नागरिकांच्या स्वाक्षऱ्या चलनावर नसल्यानेही या यंत्रणेवर शंका निर्माण होत आहे.
या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व टँकर पॉईंटची तात्काळ तपासणी करून मीटर कार्यरत असल्याची खात्री करावी, तसेच पाणीपुरवठ्यानंतर संबंधितांची सही घेण्याची सक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच, भविष्यात २४x७ पाणीपुरवठा योजनेअंतर्गत लाखो मीटरची देखभाल कशी केली जाणार, याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, मीटर तपासणी व दुरुस्ती यंत्रणा तत्काळ कार्यान्वित करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
