Sangli Crime News | ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली 59 लाखांची फसवणूक; सांगली सायबर पोलिसांकडून पुण्यातून दोघांना अटक

Sangli Crime News | 59 lakhs fraud in the name of 'Digital Arrest'; Two arrested from Pune by Sangli Cyber ​​Police

सांगली : Sangli Crime News |  केंद्रीय तपास यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून एका सेवानिवृत्त वृद्धाला ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवत तब्बल 59 लाख 9 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा सांगली सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पुणे परिसरातून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अबू हुसेन समसुल आलम Abu Hussain Shamsul Alam (वय 38, सध्या रा. काळेपडळ रोड, हडपसर, पुणे, मूळ रा. बादुवा, जिल्हा मुर्शिदाबाद, पश्चिम बंगाल) आणि सुशील अकील राम Sushil Akil Ram (34, सध्या रा. सिझन मॉलसमोर, मगरपट्टा, पुणे, मूळ रा. पश्चिम बंगाल) यांचा समावेश आहे. दोघेही सध्या पुण्यात वास्तव्यास असून मूळचे पश्चिम बंगालमधील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून बँक पासबुक, चेकबुक, डेबिट कार्ड आणि मोबाईल फोनसह मोठ्या प्रमाणावर साहित्य जप्त केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तासगाव तालुक्यातील सावळज येथील 61 वर्षीय सेवानिवृत्त व्यावसायिकाला जानेवारी 2026 मध्ये आरोपींनी फोन करून संपर्क साधला. व्हॉट्सॲप प्रोफाइलवर पोलिस अधिकाऱ्यांचे फोटो ठेवून आरोपींनी स्वतःला सीबीआय, आयकर विभाग आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवले.

त्यानंतर व्हिडिओ कॉलद्वारे तसेच सुप्रीम कोर्ट, रिझर्व्ह बँक आणि सरकारी विभागांच्या नावाने बनावट पत्रे पाठवून संबंधित व्यक्तीला एका गुन्ह्यात अटक होणार असल्याची भीती दाखवण्यात आली. मानसिक दबाव निर्माण करून 8 ते 16 जानेवारीदरम्यान तब्बल 59 लाखांहून अधिक रक्कम उकळल्याचा आरोप आहे.

तपासादरम्यान फसवणुकीतील 29 लाख 60 हजार रुपये थेट अटक आरोपींच्या विविध बँक खात्यांमध्ये जमा झाल्याचे तांत्रिक तपासातून स्पष्ट झाले. या पुराव्यांच्या आधारे सायबर पोलिसांनी पुण्यात कारवाई करत दोघांना अटक केली.

आरोपींच्या घराची झडती घेतली असता सायबर गुन्ह्यांमध्ये वापरले जाणारे साहित्य आढळून आले. यामध्ये मोबाईल फोन, सिमकार्ड, डेबिट-क्रेडिट कार्ड, चेकबुक, पासबुक आणि ओळखपत्रांचा समावेश आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

You may have missed