Timber Market Fire | टिंबर मार्केटमध्ये भीषण आग; 80 हून अधिक दुकाने, घरे जळून खाक, कोट्यावधीची हानी, कोणतीही जिवित हानी नाही
पुणे : Timber Market Fire | पुण्यातील टिंबर मार्केटमध्ये पहाटे २ वाजून ५ मिनिटांनी लागलेल्या भीषण आगीत जवळपास ८० हून अधिक दुकाने व काही घरे जळून खाक झाली.
टिंबर मार्केटमधील जय वल्लभ शाळेजवळील लाकूड वखार आणि दुकानांना पहाटे २ वाजण्याच्या सुमारास आग लागली. लाकुड आणि प्लायवुड या दुकानांमध्ये असल्याने ही आग मोठ्या प्रमाणावर भडकली. जवळच असलेल्या आग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी पोहचले. परंतु, आग वेगाने शेजारच्या दुकानांना आपल्या कवेत घेत होती. आगीचे वृत्त समजताच परिसरात एकच कल्लोळ उडाला. या दुकानांच्या मागील बाजूला वस्ती सुरु होते़ तेथील घरांपर्यंत आग पोहचू नये, यासाठी अग्निशमन दलाने २ ते ३ बंब या भागात ठेवून तेथून आग पसरु नये, म्हणून काळजी घेतली.
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पुणे अग्निशमन दलाचे २४ बंब, पीएमआरडीएचे २ बंब आणि पुणे कॅन्टोन्मेंटचा १ बंब असे एकूण २७ अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले होते. सुमारे १५० जवानांनी चारही बाजूंनी प्रयत्न करून दोन ते चार तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. पहाटे २ वाजता लागलेली ही आग अजूनही सुरु असून सकाळी साडेदहा वाजताही आग पूर्णपणे विझविण्यासाठी १० बंब कार्यरत आहेत. या आगीत तब्बल ८० हून अधिक दुकाने जळून खाक झाल्याची आतापर्यंतची माहिती आहे.
या दुकानांमध्ये प्रामुख्याने लाकडी मंदिर व इतर सजावटीचे साहित्य बनविले जात होते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर कलाकुसर केलेली लाकडे, केमिकल यांचा समावेश होता. त्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणावर भडकली.
आगीत लाकडे जळाली असली तरी खालच्या बाजूला अजूनही आग धुमसत आहे. जेसीबीच्या सहाय्याने वरील जळालेली लाकडे बाजूला करुन आग पुर्णपणे विझविण्याचे काम अजूनही सुरु आहे. महापौर मंजुषा नागपूरे व इतर अधिकारी, पदाधिकारी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. परिसरातील नागरिकांना धीर दिला.
