Wakad Pune Crime News | पुणे : कारवर आमदाराच्या बनावट स्टिकरचा वापर; वाकड पोलीस ठाण्यात बापू मच्छिंद्र ढेरे आणि रोहन जगन्नाथ काटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : Wakad Pune Crime News | कारवर महाराष्ट्र विधानसभा सदस्य असल्याचा कथित बनावट लोगो आणि ‘आमदार’ स्टिकर लावून वाहन वापरल्याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर संबंधितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, केंद्रीय मोटार वाहन नियम आणि मोटार वाहन कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार कारवाई करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, वाहतूक विभागातील सुधीर कैलास साबळे (वय 37) हे 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे साडेपाच वाजता सरकारी वाहनातून वाकड परिसरातील पार्क स्ट्रीट सोसायटीजवळून जात होते. त्यावेळी त्यांना MH 14 KQ 0125 क्रमांकाची काळ्या रंगाची कार संशयास्पदरित्या जाताना दिसली.
पोलिसांनी कारचा पाठलाग करून चालकाची चौकशी केली. चालकाने त्याचे नाव बापू मच्छिंद्र ढेरे Bapu Machhindra Dhere (वय 35) असे सांगितले. पुढील चौकशीत संबंधित वाहन रोहन जगन्नाथ काटे (Rohan Jagannath Kate), रा. पिंपळे सौदागर, यांच्या मालकीचे असल्याचे समोर आले.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कारच्या काचेवर पांढऱ्या-हिरव्या रंगाचा गोल लोगो लावण्यात आला होता. त्यावर कथितरीत्या ‘महाराष्ट्र विधानसभा सदस्य’, अशोकस्तंभ आणि ‘आमदार’ असा मजकूर होता.
या लोगो आणि स्टिकरबाबत विचारणा केली असता चालकाने समाधानकारक उत्तर दिले नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
