Pune Crime News | 15 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिला केले 5 महिन्यांची गर्भवती; लक्ष्मीनगर पोलिसांनी सुरक्षा रक्षकावर केला गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | जीवे मारण्याची धमकी देऊन एका १५ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिला ५ महिन्यांचे गर्भवती केल्याचा प्रकार समोर आला आहे. लक्ष्मीनगर पोलिसांनी फरार झालेल्या एका सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल केला आहे.
शैलेशकुमार (वय २५, रा. जयजवान नगर, येरवडा) असे या नराधमाचे नाव आहे. याबाबत एका ४२ वर्षाच्या महिलेने लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १६ नोव्हेंबर २०२५ ते १५ एप्रिल २०२६ दरम्यान सुरु होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेश कुमार हा एका सोसायटीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. तो तेथेच तळमजल्यावरील रुममध्ये रहात होता. त्याने फिर्यादी यांच्या १५ वर्षाच्या मुलीला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. कोणाला सांगितले तर जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध केले. काही दिवसांपूर्वी तिला त्रास होऊ लागला. तेव्हा तिला आईने ससून रुग्णालयात तपासणीसाठी नेले. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर ती ५ महिन्यांची गर्भवती असल्याचे दिसून आले. ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी याची माहिती लक्ष्मीनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी महिलेची फिर्याद घेऊन पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. याची कुणकुण शैलेश कुमार याला लागल्याने तो पळून गेला आहे. सहायक पोलीस निरीक्षक मिथुन सावंत तपास करीत आहेत.
