Pune Crime News | सुरक्षारक्षकाला धमकावून चौघांनी पगाराची रक्कम नेली लुटून; सुतारवाडीतील घटना
पुणे : Pune Crime News | आमचे पडलेले बँकेचे कार्ड घेतले असल्याचे सांगून सुरक्षारक्षकाची झडती घेण्याचा बहाणा करुन त्यांना धमकावून ४० हजारांची रोकड लुटून नेल्याची घटना पाषाण परिसरात घडली.
याबाबत शमसुद्दीन उर्फ समीर चाँदसाहेब ककेरी (वय २६, सध्या रा. कीर्ती गार्डन, पाषाण, मूळ रा. कर्नाटक) याने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना सुतारवाडी येथील साईविहार अपार्टमेंटच्या समोर १२ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ककेरी पाषाण येथील किर्ती गार्डनमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. तसेच मजुरीचे काम करतात. फुटपाथ पेवर ब्लॉकचे काम करुन १२ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ककेरी आणि त्याचा मित्र पाषाणमधील सुतारवाडी परिसरातून निघाले होते. त्या वेळी दुचाकीवरुन आलेल्या चौघा चोरट्यांनी ककेरी आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्राला अडवले. आमचे बँकेचे कार्ड पडले आहे. ते तुम्ही घेतले आहे. आम्हाला तुमची झडती घेऊ द्या, असे म्हणून त्यांनी जबरदस्तीने त्यांच्या खिशात हात घालण्यास सुरुवात केली.
फिर्यादी यांच्या पँटच्या खिशामधील ४० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेऊन ते सुस पुलाकडे पळून गेले. त्यांनी तातडीने ११२ वर कॉल केला़ काही वेळात पोलीस आले. त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद देण्यास सांगितले. परंतु, त्यांना गावी जाण्यासाठीची गाडी असल्याने त्यांनी फिर्याद त्यावेळी दिली नाही. गावाहून आल्यावर त्यांनी आता फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक डाबेराव तपास करत आहेत.
