Pune Crime News | व्यवहार  पूर्ण न करता महापालिकेचे सील तोडून फ्लॅटचा ताबा घेणार्‍या प्रविण ओसवाल, भारती ओसवाल यांच्यावर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | साठेखताच्या वेळी काही रक्कम दिल्यानंतर पाच वर्षात व्यवहार पूर्ण न करता फ्लॅटचा ताबा मागू लागला. कर थकल्याने महापालिकेने या फ्लॅटला सील लावले. हे सील तोडून परस्पर फ्लॅटचा ताबा घेणार्‍या प्रविण मंचलाल ओसवाल  व त्यांची पत्नी भारती ओसवाल यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत प्रकाश रामचंद्र जैन (वय ५२, रा. गगन गॅलक्सी, बिबवेवाडी) यांनी येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रविण मंचलाल ओसवाल (Praveen Manchlal Oswal), भारती प्रविण ओसवाल Bharti Pravin Oswal (रा. मडोल टॉवर्स, कोंढवा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश जैन हे बांधकाम व्यावसायिक आहेत. प्रविण ओसवाल हे जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करतात. जैन यांची कोंढवा येथे मंडोत टॉवर्स ही बिल्डिंग होती. प्रविण ओसवाल यांनी भावासाठी याअगोदर व्यवहार योग्य रितीने पूर्ण केला. त्यामुळे जैन यांचा त्यांच्यावर विश्वास बसला. प्रविण ओसवाल यांना स्वत:साठी फ्लॅट हवा होता. त्यांनी ३१ डिसेंबर २०२० रोजी स्टॅॅम्प ड्युटी भरुन २७ एप्रिल २०२१ रोजी मंडोत टॉवर्स येथील दहाव्या मजल्यावरील फ्लॅट चे साठे खत प्रविण ओसवाल यांच्यासोबत केले. त्यामध्ये फ्लॅटची किंमत ७० लाख रुपये ठरवुन २० लाख १० हजार रुपये अ‍ॅग्रीमेंटच्या वेळी मिळाले. उर्वरीत ४९ लाख ९० हजार रुपये ७ महिन्यांमध्ये देण्याचे मान्य केले. तसेच ७ महिन्यामध्ये व्यवहार पूर्ण झाला नाही, तर व्यवहार रद्द करुन १० टक्के रक्कम खर्चापोटी कपात करुन बाकी रक्कम त्यांना पाठविण्यात येईल, असे साठेखतामध्ये नमूद करण्यात आले.

जैन यांनी वारंवार संपर्क साधून व्यवहार पूर्ण करण्यास सांगितले. परंतु, प्रविण ओसवाल यांनी खोटी कारणे सांगून टाळाटाळ केली. ऑगस्ट २०२५ मध्ये प्रविण ओसवाल हे त्यांच्यासोबत योगेश जाधव व त्याचा मित्रांना घेऊन आले. आम्हाला फ्लॅटचा ताबा देण्यासाठी तसेच अतिरिक्त २ लाख रुपये देण्यासाठी फिर्यादी व त्यांच्या भावाला संपवून टाकण्याची धमकी देऊ लागले. त्यानंतर मिटींग झाली. परंतु, त्यांनी कोणत्याही पद्धतीने फ्लॅटचा ताबा दिला नाही. त्यानंतर ३० ऑगस्ट २०२५ रोजी प्रविण ओसवाल यांना वकिलामार्फत करार रद्द केल्याबाबत नोटीस पाठविली. नोटीससोबत १८ लाख ९ हजार रुपयांचा चेक पाठविला. त्यांनी ९ सप्टेंबर २०२५ रोजी वकिलामार्फत उत्तर दिले. त्यात आम्ही तुमचे सर्व पैसे दिले असून तुम्हीच आम्हाला २ लाख रुपये देणे बाकी असल्याबाबत सांगितले. तसेच या फ्लॅटचे सेल डीड करुन द्या, असे उत्तर दिले.

या फ्लॅटचा व्यवहार पूर्ण न झाल्याने फ्लॅटवर २०२१ ते २०२५ पर्यंत पुणे महापालिका यांचा कर थकीत असल्याने महापालिकेने फ्लॅटला सील करुन त्यावर नोटीस लावलेली होती. तसेच फिर्यादी यांना कॉल करुन कळविले होते. त्यानंतर नोव्हेंबर २०२५ मध्ये प्रविण ओसवाल यांनी फिर्यादी यांच्या परवानगीशिवाय हा फ्लॅटचा व्यवहार पूर्ण न करता मंडोत पॉपर्टीजमधील दहाव्या मजल्यावरील फ्लॅटच्या दरवाजाचे लॉक तोडून तसेच लॉकवर लावलेले महापालिकेचे सील तोडून बेकायदेशीरपणे प्रवेश केला. तसेच फ्लॅटचे लाईट बील त्यांच्या नावावर करुन घेतले आहे. येवलेवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

You may have missed