Maharashtra Heatwave News | उष्णतेचा कहर! अकोल्यात 46.9°ची नोंद; 22 शहरांमध्ये तापमान 40 पार; पुण्याच्या लोहगाव आणि कोरेगाव पार्क परिसरात तब्बल 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Maharashtra Heatwave News | Heatwave! Akola records 46.9°; Temperature crosses 40 degrees in 22 cities; Pune's Lohegaon and Koregaon Park areas record a whopping 43 degrees Celsius

पुणे : राज्यात उष्णतेचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून महाराष्ट्रातील तब्बल २२ शहरांमध्ये तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे गेला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भाग अक्षरशः होरपळून निघत आहेत.

रविवारी अकोल्यात राज्यातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ अमरावती (४६.८°) आणि वर्धा (४६.४°) येथेही उष्णतेने विक्रमी पातळी गाठली. भारतीय हवामानशास्त्र विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला आहे.

राज्यात सध्या हवामानाचा विलक्षण विरोधाभास पाहायला मिळत आहे. एका बाजूला प्रचंड उष्णता, तर दुसऱ्या बाजूला काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात ‘यलो अलर्ट’ आणि पावसाचा इशारा अशा दुहेरी परिस्थितीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.

पुण्यातही तापमानात लक्षणीय वाढ झाली असून कमाल तापमान ४१ अंशांवर पोहोचले आहे. लोहगाव आणि कोरेगाव पार्क परिसरात तब्बल ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, उत्तर भारतातील पश्चिमी विक्षोभ आणि दक्षिणेकडील वाऱ्यांची स्थिती यामुळे वातावरणातील बदल वेगाने होत आहेत. त्यामुळे तापमानात चढ-उतार सुरू असून काही भागांत वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे.

विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे, तर नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पुढील काही दिवसांत तापमानात २ ते ४ अंशांनी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

You may have missed