DJ Free Ganeshotsav Pune | पुण्यात 200 हून अधिक गणेश मंडळांचा ‘डीजेमुक्त गणेशोत्सवा’ला पाठिंबा – पुनीत बालन
पुणे : DJ Free Ganeshotsav Pune | दहीहंडी आणि गणेशोत्सवात डीजे तसेच मोठ्या आवाजाच्या साउंड सिस्टीमच्या वापरावरून पुण्यात सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर यंदा शहरातील 200 हून अधिक गणेश मंडळांनी डीजे-मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी दिली.
पत्रकारांशी बोलताना बालन यांनी सांगितले की, पुण्याच्या गणेशोत्सवाची पारंपरिक आणि सांस्कृतिक ओळख जपणे, तसेच ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
“गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही अनेक गणेश मंडळांनी डीजेमुक्त गणेशोत्सवाचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील 200 हून अधिक मंडळे या उपक्रमात सहभागी झाली आहेत. पुण्याच्या गणेशोत्सवाचे पारंपरिक स्वरूप कायम ठेवावे आणि उत्सवामुळे नागरिकांना त्रास होऊ नये, ही आमची भूमिका आहे,” असे बालन यांनी सांगितले.
दरम्यान, दहीहंडी आणि गणेशोत्सवात डीजे व ध्वनिवर्धकांच्या वापराबाबत पुण्यात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. काही गणेश मंडळे आणि उत्सवाशी संबंधित घटक निर्बंध शिथिल करण्याची मागणी करत असताना, पुणे पोलिसांनी निर्धारित ध्वनीमर्यादेपेक्षा अधिक आवाज करणाऱ्या साउंड सिस्टीमना परवानगी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनीही उत्सव साजरा करण्यास कोणताही विरोध नसल्याचे सांगत, ध्वनिप्रदूषण निर्माण करणाऱ्या मोठ्या आवाजाच्या यंत्रणांना परवानगी दिली जाणार नाही, अशी भूमिका मांडली आहे. निर्धारित ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करणारी साउंड सिस्टीम आढळल्यास ती तात्काळ जप्त केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
गणेशोत्सवाच्या तयारीसाठी पुणे महापालिकेत विविध विभागांचे अधिकारी, पोलीस प्रशासन आणि गणेश मंडळांच्या प्रतिनिधींची बैठकही पार पडली. या बैठकीत ध्वनिप्रदूषण, वाहतूक व्यवस्थापन, अग्निसुरक्षा आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
पुनीत बालन यांनी गेल्या वर्षीही डीजेमुक्त गणेशोत्सवाची भूमिका घेतली होती. 2025 मध्ये डीजे किंवा अनुचित गाण्यांचा वापर करणाऱ्या गणेश मंडळांना पुनीत बालन ग्रुपकडून जाहिरातीच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली होती. धार्मिक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले होते.
त्यानंतर हा उपक्रम दहीहंडी उत्सवातही राबविण्यात आला. सहभागी गणेश मंडळांसोबत आयोजित कार्यक्रमात डीजे ऐवजी पारंपरिक ढोल-ताशा, बँड आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात आले.
यंदा २०० हून अधिक गणेश मंडळे डीजेमुक्त उपक्रमात सहभागी होत असल्याने पुण्याच्या गणेशोत्सवात पारंपरिक वादन, सांस्कृतिक स्वरूप आणि ध्वनिप्रदूषण नियंत्रण यांचा समतोल साधण्याच्या चर्चेला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.
