Katraj-Kondhwa Road | कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनाला मंजुरी; 50 मीटर रुंदीकरणाला गती, 276 कोटींचा मार्ग मोकळा

Katraj-Kondhwa Road | Approval for land acquisition of Katraj-Kondhwa Road; 50 meter widening accelerated, Rs 276 crores cleared

पुणे : Katraj-Kondhwa Road | कात्रज–कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक भूसंपादनाला अखेर राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे. ५० मीटर रुंदीकरणासाठी लागणारी ४१,५१७ चौरस मीटर जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेने २७६ कोटी रुपयांची रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा केली असून, पुढील महिन्याभरात ही जागा महापालिकेच्या ताब्यात येण्याची शक्यता आहे.

या निर्णयामुळे कात्रज–कोंढवा मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून, परिसरातील लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. महापालिकेने २०१७ मध्ये या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रकल्प सुरू केला होता. मात्र भूसंपादनाचा प्रश्न न सुटल्याने हा प्रकल्प अनेक वर्षे रखडला होता.

दरम्यान, ८४ मीटरऐवजी पहिल्या टप्प्यात ५० मीटर रुंदीचा रस्ता करण्याचा निर्णय घेण्यात आला. जागामालकांना टीडीआर आणि एफएसआयऐवजी रोख मोबदला देण्याचा निर्णय घेतल्याने प्रक्रियेला गती मिळाली. शासनाने यासाठी यापूर्वी १३९ कोटी रुपयांची तरतूद केली होती.

महापालिकेने जागामालकांशी चर्चा करून भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला होता. सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महसूल विभागाने अंतिम मंजुरी दिली आहे. त्यामुळे या प्रकल्पातील मोठा अडथळा दूर झाला आहे.

आदेशानंतर भूसंपादन अधिकाऱ्यांकडून अंतिम निवाडा जाहीर होऊन १५ दिवसांत मोबदल्याचे वाटप सुरू होणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढील महिन्यात संपूर्ण जागा ताब्यात घेतली जाणार आहे. यामुळे राजस सोसायटी चौक ते कान्हा हॉटेल चौकदरम्यानचा रस्ता ५० मीटर रुंद होणार आहे.

या प्रकल्पामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या उड्डाणपुलाचे उर्वरित काम पूर्ण होण्यासही मदत होणार आहे. त्यामुळे शहराच्या वाहतुकीत मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

You may have missed