Pune Crime News | व्यावसायिकाच्या दुकानातून दहा लाखांची रोकड लंपास; कामगाराविरुद्ध गुन्हा
पुणे : Pune Crime News | शहरात व्यावसायिकाच्या कार्यालयातून तब्बल दहा लाख रुपयांची रोकड चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शुक्रवार पेठेतील सुभाषनगर परिसरात हा प्रकार घडला असून, या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
५७ वर्षीय व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीवरून अखिलेश बसंतलाल वर्मा Akhilesh Basantlal Verma (रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी वर्मा हा संबंधित व्यावसायिकाच्या कार्यालयात कामगार म्हणून कार्यरत होता.
पोलिसांच्या माहितीनुसार, १४ एप्रिल रोजी आरोपीने कार्यालयात ठेवलेली दहा लाख रुपयांची रोकड चोरून पलायन केले. घटनेनंतर व्यावसायिकाने आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तसेच त्याच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी संपर्काबाहेर असल्याचे समोर आले.
यानंतर आरोपी पसार झाल्याचे स्पष्ट होताच व्यावसायिकाने खडक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन कुदळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
