Pune Crime News | मोक्क्याच्या गुन्ह्यात 6 महिन्यांपासून फरार असलेल्या अंमली पदार्थांची तस्करी करणार्या गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने केले जेरबंद
पुणे : Pune Crime News | पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोक्का कारवाई केल्यापासून ६ महिने फरार असलेल्या अंमली पदार्थांची तस्करी करणार्या गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने जेरबंद केले आहे.
जुनेद अफजल खान Junaid Afzal Khan (वय ३५, रा. सुबान्नल्हा हॉटेलजवळ, रविवार पेठ) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.
जुनेद खान याच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात २०२२ मध्ये अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात तो जामीनावर बाहेर आहे. त्यावर दोन गुन्हे दाखल असून न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
सांगवी पोलीस ठाण्यातील अंमली पदार्थ विक्रीबाबत दाखल असलेल्या गुन्ह्यात पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोक्का कारवाई केली आहे. गेल्या वर्षीपासून तो फरार आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांना जुनेद खान हा २६ एप्रिल रोजी ताडीवाला रोड येथील विनायक नगरीसमोर येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून जुनेद खान याला पकडले. त्याला पुढील कारवाईसाठी सांगवी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार निलेश जाधव, रिहान पठाण, मंगेश गुंड व अक्षय शिर्के यांनी केली आहे.
