Nilesh Ghaiwal | गँगस्टर निलेश घायवळ 7 महिन्यांनंतरही ‘अनट्रेसेबल’; रेड कॉर्नर नोटीस बजावूनही निलेश घायवळ अद्याप फरारच
पुणे : Nilesh Ghaiwal | कोथरुडसह पुणे शहर व अहिल्यानगरमध्ये आपले साम्राज्य निर्माण करणारा गँगस्टर निलेश घायवळ हा बनावट पासपोर्टवर परदेशात आपल्या कुटुंबासह गेला. दरम्यान, पुण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा त्याच्यावर व त्याच्या टोळीवर दाखल झाला. पोलिसांनी त्याचा बनावट पासपोर्ट, व्हिसा रद्द केला. इंटरपोलमार्फत त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली. तरीही गँगस्टर निलेश घायवळ हा कोणाला अद्याप ट्रेस झालेला नाही.
पुण्यातील कोथरुडच्या मुठेश्वर चौकाजवळ १८ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री उशिरा निलेश घायवळ टोळीने रस्ता न दिल्याने एका तरुणावर गोळीबार केला. त्यात प्रकाश धुमाळ हा तरुण जखमी झाला होता. त्यानंतर घायवळ टोळीने आणखी एकावर हल्ला करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केला होता. या घटनेला १८ एप्रिल २०२६ रोजी ७ महिने पूर्ण होत आहे. पोलिसांनी नीलेश घायवळच्या भावासह त्याच्या टोळीतील अनेक गुंडांना अटक केली. परंतु, अजूनही नीलेश घायवळ कोठे आहे, याचा पत्ता लागू शकलेला नाही.
याबाबत पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले की, कोथरुडमध्ये नीलेश घायवळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेतला. तेव्हा तो परदेशात गेल्याचे समजले. त्यानंतर त्याने बनावट पासपोर्ट बनविल्याचे समजल्यावर तो पासपोर्ट आपण रद्द केला. त्याचा व्हिसा रद्द केला आहे. इंटरपोलच्या मार्फत आपण त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. कायद्याच्या दृष्टीने त्याच्या शोधासाठी आवश्यक त्या सर्व कायदेशीर बाबी पोलिसांनी पूर्ण केल्या आहेत. अजूनही तो नेमका कोठे आहे, याचा शोध लागू शकलेला नाही. त्याचा व्हिसा ६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत वैध होता. त्यानंतरही तो अद्याप भारतात परत आलेला नाही. त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही.
कोथरुड येथील गोळीबार प्रकरणी कोथरुड पोलिसांनी मयुर कुंभारे, आनंद चांडलेकर, गणेश राऊत, मॉटी व्यास आणि दिनेश पाठक या पाच जणांना अटक केली आहे. त्या सर्वावर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय वारजे पोलीस ठाण्यात नीलेश घायवळ व त्याचा भाऊ सचिन घायवळ यांच्यासह १३ जणांवर ४५ लाखांची खंडणी उकळल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यातही मोक्का कारवाई करण्यात आली आहे. नीलेश घायवळ याच्या घराची झडती घेतली. तेव्हा त्याच्याकडे पिस्टल व जिवंत काडतुसे सापडली. लोणावळ्याहून त्याच्या साथीदाराला पोलिसांनी पकडले. त्याच्याकडे ४०० काडतुसे सापडली होती.
पोलिसांनी निलेश घायवळचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा तो परदेशात गेल्याची व लंडनला असल्याची सर्वप्रथम माहिती मिळाली. गेल्या २७ वर्षांपासून त्याच्यावर गुन्हे दाखल असताना परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट कसा मिळाला, याची चौकशी केल्यावर त्याने अहिल्यानगर येथून गायवळ असे नाव लावून पासपोर्ट व व्हिसा मिळविल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याचा पासपोर्ट रद्द करविला. काही वेळा तो स्वीझरलँडला गेल्याची माहिती समोर आली होती. मात्र अजूनही तो नेमका कोठे आहे़ हे समजू शकलेले नाही.
पोलिसांनी परराष्ट्र मंत्रालयामार्फत ब्रिटिश उच्चायुक्तांकडे याबाबत विचारणा केली होती. त्यावेळी त्यांनी पुणे पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, नीलेश घायवळ सध्या लंडन मध्ये आहे. तो ६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत वैध असलेल्या व्हिजिटर व्हिसावर तेथे थांबला आहे. घायवळचा मुलगा लंडनमधील शाळेत शिक्षण घेत आहे. त्याला भेटण्यासाठी त्याने व्हिसा घेतला होता. त्याचा वैध व्हिसाची मुदत संपल्यानंतरही तो अद्याप हाती लागला नाही. सध्या पोलीस युके सरकाकडे त्याच्या प्रत्यार्पणासाठी पाठपुरावा करत आहे.
