Pune Crime News | पुणे : सराफांना 14 कोटींचा  गंडा घालणार्‍या व्यावसायिक पंकज गौतमचंद जैन, नेमीचंद विशनराज कोरीमुथा यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  सोने, चांदी घेऊन त्याबदल्यात नवीन वस्तू बनवुन देण्याचा वायदा करुन शहरातील रविवार पेठेतील अनेक सराफ व्यावसायिकांना सुमारे १४ कोटी रुपयांना गंडा घालणार्‍या दोघा व्यावसायिकांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

पंकज गौतमचंद जैन Pankaj Gautamchand Jain (वय ४८, रा. मनमोहन रेसिडेन्सी, शांतीनगर सोसायटीजवळ, कोंढवा बिबवेवाडी रोड) आणि नेमीचंद विशनराज कोरीमुथा Nemichand Vishanraj Korimutha (वय ५९, रा. ओ २३०१, गंगाधाम टॉवर्स, मार्केटयार्ड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

सोने चांदी घेऊन त्याबदल्यात नवीन वस्तू बनवुन देण्याच्या वायदा करुन कोरीमुथा व पंकज जैन यांनी कोणाकडून ६० किलो चांदी, कोणाकडून सोने, रोकड घेऊन सराफ व्यावसायिकांची फसवणूक केली होती. याबाबत बंडगार्डन येथील राठोड ज्वेलर्सचे संजय पुष्कराज राठोड (वय ५५, रा. सुजय गार्डन, मुंकुंदनगर) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात २८ जानेवारी २०२६ रोजी फिर्याद दिली होती. त्यावरुन पोलिसांनी अमन कोरीमुथा Aman Korimutha (वय २७, रा. शांतीनगर सोसायटी, महात्मा फुले पेठ) याला अटक केली होती.

हा प्रकार २२ जानेवारी २०२६ रोजी बंडगार्डन रोडवरील राठोड ज्वेलर्स येथे घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय राठोड यांचे बंडगार्डन रोडवर राठोड ज्वेलर्स हे दुकान आहे. पंकज जैन, नेमीचंद कोरीमुथा हे नवकार ज्वेलर्स व श्री नवकार प्लस या ज्वेलर्सचे मालक आहेत. राठोड यांनी नवीन माल घेण्यासाठी त्यांना ६० किलो चांदी दिली होती. ते नवीन माल दोन ते तीन दिवसांत देणार होते. परंतु, त्यांनी दोन -तीन दिवसांचा वायदा केल्यानंतरही नवीन वस्तू बनवून दिल्या नाहीत. त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यावर संपर्क होऊ शकला नाही. तेव्हा त्यांनी इतर व्यावसायिक मित्रांकडे चौकशी केली. तेव्हा हरी विजय बाळकृष्ण देवकर यांच्याकडून त्यांनी ९८ लाख रुपये घेतल्याचे समजले. तसेच उमेश दराडे यांना ५० किलो चांदी देण्याचा वायदा करुन त्यांच्याकडून ४० लाख रुपये घेतल्याचे़ समजले. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यावर राठोड यांनी कोरेगाव पार्क पोलिसांकडे फिर्याद दिली.

कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण यांनी हा व्यवहार पाहणारा त्यांचा पुतण्या अमर कोरीमुथा याला अटक केली होती. त्याच्याकडून ६७६ किलो चांदी जप्त केली आहे.

हा गुन्हा दाखल झाल्याने या त्रिकुटांनी अनेकांना फसवल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. त्यांनी रविवार पेठेतील अनेक सराफ व्यावसायिकांना टोप्या घातल्याचे उघड झाले. सराफांची फसवणूक झाल्याचा आकडा हा जवळपास १४ कोटी रुपयांवर गेला. त्यानंतर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.

आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक जानराव यांनी तपास हाती घेतला आहे. पोलिसांनी चारी बाजुने नाकाबंदी केल्यानंतर आता पंकज जैन आणि नेमीचंद कोरीमुथा हे पोलिसांना शरण आले. पोलिसांनी त्यांना अटक केली असून न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

You may have missed