Pune ACB Demand Trap Case | पुणे : 22 लाखांच्या लाचेची मागणी करणार्‍या उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकाला अँटी करप्शनकडून अटक

Pune ACB Trap Case

पुणे : Pune ACB Demand Trap Case | मद्यविक्री परवाना मिळवुन देण्यासाठी व्यावसायिकाकडे तब्बल २२ लाखांची लाच मागणार्‍या राज्य उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षकाला अँटी करप्शनने अटक केली आहे.

जितेंद्र हरिश्चंद्र पाटील Jitendra Harishchandra Patil (वय ४७, रा. सारथी शिवाली बिल्डिंग, मृत्युंजय महादेव मंदिरासमोर कर्वे रोड, कोथरुड, मुळ रा. गजानन नगर, परभणी) असे अटक केलेल्या निरीक्षकाचे नाव आहे.

याप्रकरणी लायसन्स कन्सल्टंट असलेल्या व्यावसायिकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. निरीक्षक जितेंद्र पाटील यांनी तक्रारदार यांच्या एका फर्मचे एफ एल ३ चा परवाना मिळण्याकामी फाईल मंजुरीसाठी पुढे पाठवली, म्हणून १२ लाख रुपये व त्याच फर्मची मायक्रो ब्रेव्हरी फीची फाईल मंजुर करण्यासाठी ८ लाख रुपये अशी एकूण २० लाख रुपये लाचेची मागणी केली होती. याची तक्रार १० एप्रिल २०२६ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली. त्यानंतर तक्रारीच्या अनुषंगाने १३ एप्रिल तसेच २१ मे व २२ मे २०२६ रोजी पडताळणी केली. त्यात जितेंद्र पाटील याने तक्रारदार यांच्याकडे एकूण २२ लाख रुपयांची लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ११ लाख रुपयांची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आता लाच मागणीचा गुन्हा येरवडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून जितेंद्र पाटील याला सोमवारी सायंकाळी अटक करण्यात आली. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सतिश वाळके, पोलीस अंमलदार भूषण ठाकूर, विकास आडके, चंद्रकांत कदम, विशाल माने, वनिता गोरे यांनी केली आहे.

You may have missed