Pune Satara Highway Accident | पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; डिव्हायडर तोडून कार 3-4 वेळा उलटली, ट्रकला धडकली; 4 तरुणांचा मृत्यू

Pune Satara Highway Accident | Horrific accident on Pune-Satara highway; car overturned 3-4 times after breaking the divider, crashed into a truck; 4 young men dead

पुणे: Pune Satara Highway Accident |  पुणे-सातारा महामार्गावरील शिरवळ परिसरात मंगळवारी पहाटे भीषण अपघात झाला. भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर कार डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेच्या मार्गिकेवर गेली. त्यानंतर कार तीन ते चार वेळा उलटून समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली.

या भीषण अपघातात मावळ तालुक्यातील १९ ते २० वर्षे वयोगटातील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित तरुण मध्यरात्री पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जात होते. खंडाळा तालुक्यातील शिरवळ परिसरात साताऱ्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर भरधाव वेगातील नेक्सॉन कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले.

यानंतर कार डिव्हायडर तोडून पुण्याकडे जाणाऱ्या विरुद्ध मार्गिकेवर गेली. डिव्हायडरला धडकल्यानंतर कार तीन ते चार वेळा उलटली आणि समोरून येणाऱ्या ट्रकवर जाऊन आदळली.

धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला. अपघाताची माहिती मिळताच शिरवळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वाहनात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या अपघातात वेदांत अर्जुन बारिंगे (वय १९, रा. तळेगाव दाभाडे), सोनसिंग धीरेंद्र ठाकूर (वय १९, रा. कामशेत), आदित्य बाळासाहेब गरुड (वय १९, रा. टाकवे) आणि निखिल बाळू राऊत (वय २०, रा. कामशेत) या चौघांचा जागीच मृत्यू झाला.

कार मयूर हनुमंत शिंदे (वय २०) चालवत असल्याची माहिती आहे. अपघातात मयूर आणि दीक्षित नावाचा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

या अपघातप्रकरणी ट्रकचालक शिकुमार देवांगत यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.

You may have missed