Pune Crime News | तुम्ही अल्पवयीन मुलींचे गर्भपात करता, तुमच्या क्लिनिकचे नाव पेपरमध्ये देऊ; अशी धमकी देऊन डॉक्टरांकडे 10 लाखांची खंडणी मागणार्या दोघा तोतया पत्रकारांवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | तुम्ही व तुमची पत्नी अल्पवयीन मुलींचे गर्भपात करता, माझ्याकडे माहिती आहे. तुमच्या क्लिनिकचे नाव पेपरमध्ये छापू अशी धमकी देऊन डॉक्टरांकडे १० लाख रुपयांची खंडणी मागण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विश्रांतवाडी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़
प्रणव/ प्रसाद बोरसे (वय २५), शुभम सौदागर (वय २६, दोघे रा. विश्रांतवाडी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत विमाननगर येथील एका स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना टिंगरेनगर येथील हॉटेल ऑरम बँकवेट येथे ४ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर असून गेली ३ दशके ते डॉक्टरी व्यवसाय करतात. त्यांचे विश्रांतवाडी मध्ये क्लिनिक आहे. ते टिंगरेनगरमधील हॉटेल ऑरम बँकवेट येथे गेले होते. त्यावेळी दोघे जण त्यांना भेटले. त्यांनी फिर्यादी व त्यांच्या पत्नी हे अल्पवयीन मुलींचे गर्भपात करत असल्याबाबतची आमच्याकडे माहिती आहे. मी पत्रकार असून तुमचे नाव पेपरमध्ये देऊन तुमचा दवाखाना बंद करु शकतो. त्यामध्ये तुम्हाला ५ वर्षांची शिक्षा होईल, जामीन मिळण्यास तीन, चार वर्षे लागतील. तुमच्या डिगर्या जातील़ असे बोलून तुम्हाला वाचायचे असेल तर आताचे आता मला १० लाख रुपये खंडणी द्यावी लागेल, नाही तर सकाळी १० वाजता तुम्हाला अटक होईल, अशी धमकी दिली. त्यावेळी त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर त्यांनी तक्रार अर्ज दिला होता़ त्यावरुन आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुनिल उगले तपास करीत आहेत.
