Pune Crime News | विमाननगर परिसरातील बांधकाम व्यावसायिकाला टायसन बिष्णोईच्या नावाने 5 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकी
पुणे : Pune Crime News | बांधकाम व्यावसायिकाच्या कुटुंबियांची सर्व माहिती घेऊन त्यांना धमकी देऊन ५ कोटी रुपये खंडणी मागण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विमाननगर येथील बांधकाम व्यावसायिकाने खंडणी विरोधी पथकाकडे फिर्याद दिली आहे. विमानतळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या बांधकाम व्यावसायिकाची फोन करणार्यांनी सर्व माहिती घेऊन रेकी केली असल्याचे त्याच्या बोलण्यावरुन दिसून येत आहे. १२ ते १४ ऑगस्ट दरम्यान सातत्याने या बांधकाम व्यावसायिकाला फोन येत होते़ सर्व प्रथम १२ ऑगस्ट रोजी त्यांना रात्रीच्या वेळी फोन आला होता. अनोळखी नंबरवरुन व्हॉटसअॅपचा कॉल असल्याने त्यांनी तो उचलला नाही. १३ ऑगस्ट रोजी पुन्हा रात्री कॉल आले. त्यांनी उचलले नाही. नंतर त्याने साधा कॉल केला. परंतु, तिकडून काही आवाज नीट ऐकू येत नव्हता. म्हणून त्यांनी फोन कट केला. नंतर आलेला कॉल त्यांनी घेतला. तेव्हा तो म्हणाला, ‘‘मै टायसन, राजस्थान से, रंगदारी के लिए कॉल किया है’’ तेव्हा त्यांना वाटले की कोणीतरी रंगकाम मागण्यासाठी कॉल केला असेल, असे वाटून त्यांनी त्या कॉलकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर १४ ऑगस्ट रोजी पहाटे २ वाजता त्यांना व्हॉटसअॅप कॉल आला. तो म्हणाला, ‘‘ मै टायसन बिष्णोई बात कर रहा हू, आपकी बाहोत मोटा कारोबार करा है, जे काम कर रहे और आप ऐसे ही कारोबार करते रहो तो आप को ५ करोड रुपये देना पडेगा, मेरे को अगर आप के मन मे वहम है तो आप की’’ असे म्हणून त्याने त्यांची मुलगी, भाऊ, बहिण त्यांचा परिवार हे काय काय काम करतात, कोठे असतात, याची माहिती दिली. जर तुम्हाला शंका असेल तर तुम्ही ब्लॉक करु शकता.
जेव्हा परिवारातील एखाद्या मेंबरला गोळी लागली की तुम्हाला माझी गोष्ट लक्षात येईल. तेव्हा ५ च्या जागी १५ किंवा २० कोटी रुपये द्यावे लागतील, अशी धमकी दिली. उद्या पुन्हा याच वेळी फोन करेल, फोन घेतला नाही तर तुमचे नुकसान होईल, तुमच्या पार्टनरशी बोलून ठरवा. त्यानंतर त्यांना दुसऱ्या दिवशी अनेक फोन आले. परंतु, त्यांनी घाबरुन फोन घेतले नाही. तेव्हा त्याने टेक्स मेसेज केला. त्यात त्यांच्या पार्टनरची मुले काय करतात, याची माहिती दिली होती. त्यानंतर फोन करणार्याने त्यांच्या पार्टनरला टेक्स मेसेज केला. त्यात ‘‘अगर आप अपने परिवार के जीवन का सही मूल्य समझते है, तो अपने भाई से बात किजिए, धीरे धीरे यह संदेश परिवार के सभी सदस्यों तक पहुंच जाएगा और फिर गोलिया चलेंगी टायस बिष्णोई’’ असा मेसेज केला आहे. या प्रकारामुळे या बांधकाम व्यावसायिकाने पोलिसांकडे धाव घेतली. विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक दिलीप पालवे तपास करीत आहेत.
