Pune Crime News | चालत्या बसमध्ये महिला वाहकावर तरुणाने केला चाकू हल्ला; पुणे स्टेशन येथील अंलकार चौकाजवळील घटनेत महिला जखमी

crime

पुणे : Pune Crime News |बसमध्ये शिवीगाळ करणार्‍याला महिला वाहकने शिव्या देऊ नको, नाही तर खाली उतर, असे सांगितल्याने तरुणाने त्यांच्या अंगावर धावून जात चाकूने त्यांच्या मांडीवर वार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

या घटनेत पीएमपी वाहक सुरेखा बळीराम भालेराव (वय ३८, रा. मुळशी, मुळ रा. मुखेड, जि. नांदेड) या जखमी झाल्या आहेत.  बंडगार्डन पोलिसांनी चाकू हल्ला करणार्‍या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पुणे स्टेशन येथील अलंकार चौकात १५ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,महापालिका भवन ते विमाननगर मार्गावरील पीएमपी बस १५ एप्रिल रोजी रात्री आठच्या सुमारास पुणे स्टेशन परिसरातील अलंकार चित्रपटगृह चौकातून निघाली होती. त्या वेळी भालेराव प्रवाशांचे तिकीट काढण्याचे काम करत होत्या. त्या वेळी प्रवासी तरुणाला त्यांनी तिकिट काढण्यास सांगितले. या कारणावरुन प्रवासी तरुणाने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. भालेराव यांनी त्याला बसमधून खाली उतरण्यास सांगितले. याचा राग येऊन तो भालेराव यांच्या अंगावर धावून गेला. चाकूसारख्या हत्याराने त्यांच्या मांडीवर वार करुन तो बसमधून उडी मारुन पसार झाला.  महिला वाहक यांनी यापूर्वी केलेल्या तक्रारीतील आरोपीने या तरुणाला हल्ला करण्यास सांगितले असावे, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. अंदाजे २० वर्षाच्या तरुणाचा पोलीस शोध घेत आहेत़ पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण तपास करत आहेत.

You may have missed