Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून टोळक्याने तरुणावर वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; उत्तमनगर पोलिसांनी दोघांना केली अटक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून टोळक्याने तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टुने मारहाण करुन त्याला जीवे ठार करण्याचा प्रयत्न केला. उत्तमनगर पोलिसांनी दोघांना अटक केली असून दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

क्रिश सुरेंद्रसिंग (वय २०, रा. अचानक चौक, उत्तमनगर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. क्रिश अजून बोलण्याच्या स्थितीत आलेले नसून ससून रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. याबाबत तेथील ज्युस विक्रेता विशाल चंद्रकांत घोरपडे (वय ३६, रा. लक्ष्मी निवास, देशमुखवाडी, शिवणे) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी लवेश महेंद्र सोत्ता Lavesh Mahendra Sotta (वय १९) आणि समद ऊर्फ चिक्क्या परवेज शेख Samad alias Chikya Parvez Shaikh (वय १८, दोघे रा. उत्तमनगर) यांना अटक केली आहे. ही घटना उत्तमनगरमधील देशमुखवाडी येथील लक्ष्मी निवास बिल्डिंग येथील ज्युस गाडीचे समोर गुरुवारी सायंकाळी ५ वाजता घडली. न्यायालयाने दोघांना २१ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल घोरपडे यांची ज्युसची गाडी आहे. त्याच्या गाड्या शेजारी फुलांच्या हाराचे दुकान असलेले कानसकर व त्यांच्याबरोबर क्रिश हे ज्युस पिण्यासाठी आले होते. कानसकर हे ज्युस ओतून घेत असतानाच दुचाकीवरुन चौघे जण आले. त्यांनी क्रिशला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. चार मुलांपैकी लवेश सोत्ता याचे वडिल महेंद्र सोत्ता यांची ज्युस गाड्याशेजारीच भोलेनाथ या नावाने आईस्क्रीम चा गाडा आहे. लवेश याने शिवीगाळ करुन याला खल्लास करुन टाकायचे, असे बोलून बाजूला पडलेला सिमेंटचा गट्टु उचलून क्रिशच्या डोक्यात मारला. सर्वांनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दुसर्‍या मुलाने तेथील दुसरा सिमेंटचा ब्लॉक उचलून डोक्याचे जवळ कानावर मारला. क्रिश याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्त येत होते. लोक धावत आल्यानंतर ही मुले पळून गेली. लोकांनी क्रिश याला तातडीने रुग्णालयात दाखल केले.

त्यानंतर विशाल घोरपडे हे तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले. तोपर्यंत पोलिसांनी या चौघांना पकडून आणले. त्यांनी चौघांनाही ओळखले.
तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अक्षय पाटील यांनी त्यांच्याकडे चौकशी केल्यावर क्रिश याने गेल्या महिन्यात जुन्या भांडणाच्या कारणावरुन त्यांना मारहाण केली होती, असे सांगितले. क्रिश अजून बोलण्याच्या स्थितीत नसल्याने त्याचा जबाब घेता आलेले नाही. पोलीस उपनिरीक्षकअक्षय पाटील तपास करीत आहेत.

You may have missed