Pune Crime News | शिवानंद पाटील याचा आणखी एक करिश्मा; महापालिकेत क्रीडा अधिक्षक असल्याचे सांगून तरुणांची 1 कोटी 20 लाखांची फसवणुक
पुणे : Pune Crime News | महापालिकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवुन तरुणांकडून लाखो रुपये घेऊन फसवणूक करणार्या महापालिकेतील कर्मचारी शिवानंद पाटील याचा आणखी एक करिश्मा समोर आला आहे. त्याने एका तरुणाला महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखवुन १५ लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे. तसेच त्यांच्या मित्रांना वेगवेगळ्या पदांवर कायम नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून १ कोटी ५ लाख रुपये रोख स्वरुपात घेऊन फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
शिवानंद बाळासाहेब पाटील Shivanand Balasaheb Patil (वय ४५, रा. आनंद कॉलनी, कर्वेनगर) असे त्याचे नाव आहे. शिवानंद पाटील याला महापालिकेने निलंबित केले असून शिवाजीनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध पर्वती पोलीस ठाण्यात एका धायरीतील ३५ वर्षाच्या तरुणाने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवानंद पाटील याने या तरुणाला आपण महापालिकेत क्रीडा अधिकारी असल्याचे सांगून मंत्रालयात चांगली ओळख आहे. महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. त्यांच्याकडून १५ लाख रुपये घेतले. पुणे महापालिकेत वरिष्ठ अभियंता (विद्युत) व उप आयुक्त पदाचे ११ मार्च २०२४ रोजीचे सहीचे नियुक्ती पत्र दिले. पाटील याने पुणे मनपामध्ये मोठ्या प्रमाणावर भरती असल्याने सर्वांना एकत्रित हजर करुन घेण्याचे तोंडी आदेश झालेले आहेत. तुझे आणखी कोणी असेल तर तु त्यांना मला भेटव, असे सांगितले. म्हणून त्यांनी ओळखीचे ६ तरुणांनी शिवानंद पाटील याच्याशी भेट करुन दिली. पाटील याच्या सांगणेवरुन या सर्वांनी मिळून त्यास वेगवेगळ्या पदांसाठी एकूण १ कोटी ५ लाख रुपये रोख स्वरुपात दिले. हे सर्व करण्यास एक वर्षाचा कालावधी गेला. सर्वांना पुणे महानगर पालिकेमधील सहीचे लेखी नियुक्ती पत्र देण्यात आले. परंतु, कोणालाही जॉईनिंग लेटर दिले नाही़ म्हणून त्यांना सशंय आला. त्यांनी पैसे परत करण्यासाठी तगादा लावला. त्यावेळी त्याने फिर्यादीला हजर न करुन घेता त्यांची बदली महानगर पालिकेचे वेगवेगळे आस्थापनेवर झालेबाबत १३ डिसेंबर २०२४ रोजीचे बदलीचे आदेशाचे पत्र दिली. या सर्व गोष्टीमुळे तुला हजर करुन घेण्यास वेळ लागत आहे, असे सांगितले.
गेल्या अडीच वर्षांपासून शिवानंद पाटील याने काही ना काही कारण देऊन तसेच वेगवेगळे आदेश देऊन जॉइनिंग लेटर देण्यास टाळाटाळ केली. त्यांनी ही बाब आपल्या मित्रांना सांगितले. त्यांनाही शिवानंद पाटील याने असेच सांगून फसवणूक केल्याचे सांगितले. शिवानंद पाटील याच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये लोकांनी गुन्हे दाखल केले असल्याचे समजल्यावर त्यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पर्वती पोलीस शिवानंद पाटील याचा वर्ग करुन घेऊन अटक करणार आहेत. पोलीस निरीक्षक अनिता हिरवकर तपास करीत आहेत.
