Pune Crime News | भाजपच्या माजी नगरसेवकाच्या पतसंस्थेतील घोटाळ्याच्या तपासात हलगर्जीपणा केल्याचा सहायक पोलीस निरीक्षकावर ठपका; पोलीस सह आयुक्तांनी दिली शिक्षा
पुणे : Pune Crime News | भाजपच्या माजी नगरसेवकाच्या पंतसंस्थेतील ठेवीदारांची कोट्यावधीची फसवणूक केल्या प्रकरणाच्या तपासात अटकपूर्व जामीन फेटाळल्या गेलेल्या आरोपींना अटक न करणे यापासून वेगवेगळ्या मुद्द्यावरील तपासात हलगर्जीपणा करुन कर्तव्यापोटी सचोटी संशयास्पद असल्याचे दिसून येत असल्याचा पोलीस सह आयुक्त संजय दराडे यांनी तपासी अधिकार्यावर ठपका ठेवला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग माणिक वाघमारे (Pandurang Manik Waghmare) असे या तपासी अधिकार्याचे नाव आहे.
ठेवीदारांची कोट्यावधीची फसवणूक केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात २०२४ मध्ये निनाद नागरी सहकारी पतसंस्था व तिच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग वाघमारे यांच्याकडे आहे. या गुन्ह्यात माजी नगरसेवक उदय त्र्यंबक जोशी, त्यांची पत्नी व माजी नगरसेविका शुभदा जोशी, त्यांचा मुलगा मयुरेश उदय जोशी यांच्यासह २३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील मुख्य आरोपी उदय जोशी यांचा येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असताना गेल्या वर्षी डिसेंबर २०२५ मध्ये मृत्यु झाला आहे. माजी नगरसेविका शुभदा जोशी यांना नुकताच न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
पोलीस सह आयुक्त संजय दराडे यांनी या प्रकरणाशी संबंधित दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, या गुन्ह्यात ३ आरोपींविरुद्ध ३१ जानेवारी २००२५ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. त्यानंतर आजपर्यंत या गुन्ह्यात काही एक तपास करण्यात आला नाही. त्यात एकही केस डायरी लिहलेली नाही. या गुन्ह्यात एकूण २३ आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी काही आरोपीचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलेले असूनही या आरोपीच्या अटकेबाबत काही एक कार्यवाही करण्यात आलेली नाही.
उर्वरित निष्पन्न आरोपीचे तपासाच्या अनुषंगाने आजपावेतो घरझडती घेण्यात आलेली नाही.
आरोपीचे गुन्हे सहभाग अनुषंगाने पुरावे कामी त्यांचे वापरते मोबाईलचे सीडीआर/ एस डीआर काढून त्याबाबत पुढील तांत्रिक विश्लेषण करुन पुरावा उपलब्ध करण्याकामी काही एक प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही.
आरोपीचे गुन्हे अनुषंगाने वापरण्यात आलेल्या बँक खात्यांची गुन्हे कालावधीतील बँक डिटेल्स/ खाते उतार्यांची माहिती घेऊन अधिक पुरावा उपलब्ध करण्याबाबत प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही.
गुन्ह्यातील आरोपी पतसंस्थेचे अध्यक्ष यांनी त्यांचे जवळचे नातेवाईक यांच्या नावे असलेली श्रीराम गॅस एजन्सीला पतसंस्थेचे मार्फत वेळोवेळी नियमबाह्य पद्धतीने सुमारे ३ कोटी एवढे कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्याबाबत काही एक तपास करण्यात आलेला नाही. तसेच कोणताही कागदोपत्री पुरावा प्राप्त केलेला नाही. श्रीराम गॅस एजन्सीचे सर्व हक्क हे मुख्य आरोपी व इतर यांनी नवीन मालक यांना विकले. त्याबाबत बीपीसीएल यांचेकडील कायदेशीर प्रक्रिया, अर्ज, त्यावर झालेले निर्णय याबाबत सर्व कागदपत्रे प्राप्त करणेबाबत काहीएक प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही.
मुख्य आरोपी यांचे नातेवाईक यांचे नावे असलेली श्रीराम गॅस एजन्सीचे नवीन मालक यांचे नावावर वर्ग केली असून गॅस एजन्सीबाबत सर्व बँक खाती व जीएसटी खाते नियमाप्रमाणे गोठविण्याबाबत काही एक प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही.
मुख्य आरोपी यांचे निनाद नागरी पतसंस्थेतील बँक खातेवरुन सचिव व अध्यक्ष यांनी त्यांचे धार्मिक विधी कामकाजाकरीता १० लाख रुपये व्हाऊचर द्वारे रोख स्वरुपात २९ डिसेंबर २०२३ रोजी काढून घेतले असून त्याबाबत तसेच इतर गैर कायदेशीररित्या वाटप करण्यात आलेल्या कर्जप्रकरणाबाबत काही एक तपास केल्याचे दिसून येत नाही.
दाखल गुन्ह्याचे तपास अनुषंगाने निष्पन्न आरोपी यांचे गुन्ह्यात वापरण्यात आलेले सर्व बँक अकाऊंट फ्रिज करण्याबाबत तसेच मालमत्ता नियमाप्रमाणे जप्त करण्याबाबत तसेच त्यांच्या बँक ठेवी गोठविण्याबाबत पुढील कार्यवाही करणे आवश्यक असताना तसे करण्याबाबत काही एक विशेष प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही.
तपासी अधिकारी यांना समक्ष वारंवार सुचना देऊनही तुम्ही दिलेल्या सुचनांकडे दुर्लक्ष करुन तपासात हयगय केलेली आहे.
एकंदरीत तुम्ही योग्य प्रकारे अधिक तपास न करता वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे. यावरुन तुमची कर्तव्यापोटी सचोटी संशयास्पद दिसून येत आहे. या गुन्ह्याचे तपास अधिकारी म्हणून तुमचे हे वर्तन पोलीस दलाच्या शिस्तीत बाधा आणणारे व अत्यंत बेशिस्तपणाचे तसेच पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारे आहे. या कसुरीसाठी तुम्हाला देय वार्षिक वेतनवाढ त्यापुढील वेतनवाढीवर परिणाम होणार नाही, अशा रितीने २ वर्षेसाठी का रोखण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. त्यावर तपासी अधिकारी यांनी ७ ऑगस्ट २०२६ रोजी उपस्थित राहून खुलासा दिला. हा खुलासा पूर्णत: समाधानकारक नाही, त्यामुळे तपासी अधिकारी यांना पोलीस सह आयुक्त संजय दराडे यांनी ताशेरे ओढणे अशी शिक्षा दिली आहे.
उदय जोशी हे सदाशिव पेठेतून भाजपचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तो वॉर्ड महिला राखीव झाल्यानंतर तेथून त्यांच्या पत्नी शुभदा जोशी या भाजपकडून निवडुन आल्या होत्या.
