Pune Crime News | व्यापार्‍याची फसवणूक केल्याप्रकरणी शेखर बापुसाहेब चिंधे, अमित देवराम कलाटे यांच्यावर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | व्यवसायासाठी व्यापार्‍याने व्याजाने पैसे घेतले. ते फेडत असताना पैसे देणारे मुळ रक्कम परत मागू लागले. तेव्हा व्यापार्‍याने दुसरीकडून व्याजाने पैसे घेण्याचा प्रयत्न केला. त्यात तारण म्हणून दोन गाळ्यांचे कुलमुखत्यार पत्र तयार करताना या व्यापार्‍याची अगोदर सही फोटो घेतला. त्यानंतर कागद चुकला असे म्हणून दुसर्‍यांदा फोटो, सही घेतली. प्रत्यक्षात कुलमुखत्यार पत्राबरोबर त्यांनी फसवून खरेदी खत केल्याचे उघड झाले. ३ कोटींची मालमत्ता ३५ लाखांमध्ये खरेदी केल्याचे प्रकार समोर आला आहे.

याबाबत हसमुख पारसमल जैन (वय ४२, रा. गगन उन्नती सोसायटी, कात्रज कोंढवा रोड) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी शेखर बापुसाहेब चिंधे Shekhar Bapusaheb Chindhe (रा. जांभुळवाडी, ता. हवेली) आणि अमित देवराम कलाटे Amit Devram Kalate (रा. वाकड, ता. हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २२ मार्च २०२३ ते १६ एप्रिल २०२६ दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हसमुख जैन यांचे वडिल पारसमल जैन यांनी कुदळे पाटील प्रेस्टीज बिल्डिंग येथील गाळा नंबर ६ व ७ ही दोन दुकाने चिंतन बिल्डर्स यांच्याकडून १९९८ -९९ मध्ये खरेदी खताने विकत घेतली होती. या दुकानावर अ‍ॅड. संभाजी हणमंत थोरवे हे येत असल्याने त्यांची ओळख होती. २००१ ते २०१४ पर्यंत दोन दुकानामध्ये सोने चांदीचे दुकान होते. वडिल आजारी पडल्याने चार वर्षे दुकान बंद होते. त्यांनी दोन पैकी एक गाळा नंबर ६ भाड्याने दिला. त्यानंतर त्यांनी २०२२ मध्ये पारंपारीक ज्वेलरी व्यवसाय सुरु केला. त्यासाठी उत्कर्ष स्मोल फायनान्स येथून गाळा नंबर ६ वर ५० लाखांचे कर्ज घेतले. त्याचे नियमित हप्ते भरत होते. मार्च २०२३ मध्ये त्यांनी पाडव्याचा सण जवळ आल्याने तातडीने माल खरेदीसाठी २५ लाखांची गरज होती.

अ‍ॅड. संभाजी थोरवे यांच्या ओळखीने शेखर चिंधे यांच्याकडून १० टक्के व्याजाने पैसे घेतले. त्यासाठी आंबेगाव येथील सब रजिस्टार ऑफीसमध्ये जाऊन शेखर चिंधे यांच्या नावाने पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी केली. त्यावेळी थोरवे यांनी त्यांच्या शिंदेवाडी येथील जागेचा सातबारा उतारा सुद्धा मागवुन घेतले. थोरवे यांनी सांगितले की , आपण त्याचेकडे २५ लाख मागितले होते. परंतु तुझ्या खात्यावर ५० लाख रुपये येतील. त्यातील २५ लाख रुपये मला दे. त्यानुसार सिक्युरिटी चेक घेतले होते. त्यातील एक चेकवर २५ लाख रुपये लिहून थोरवे यांना दिला. त्यानंतर ते दर महा अडीच लाख रुपये प्रमाणे ६ महिने व्याजापोटी ओंकार चिंधे व संभाजी थोरवे, राजेश थोरवे यांना देत होते. त्यानंतर शेखर चिंधे यांनी आमचे दिलेले पैसे परत करा, असा तगादा लावला. त्यांनी थोरवे यांना यातून मार्ग काढायला सांगितले.

थोरवे यांनी अमित कलाटे यांची ओळख करुन दिली. ऑक्टोंबर २०२३ मध्ये सुरज लोखंडे, याने मी अमित कलाटे असे दोघे पार्टनर आहे, असे सांगितले़ होते. ते व्याजाने ३५ लाख रुपये देण्यास तयार झाले. त्यासाठी गाळ्याची पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी करुन द्यावी लागेल, असे सांगितले. त्यांनी दोन्ही दुकानावर पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी करुन देण्याचा आग्रह धरला.

संभाजी थोरवे यांनी ८ नोव्हेबर २०२३ रोजी हवेली सब रजिस्टार कार्यालयात बोलावले. तेथे अगोदरच सर्व कागदपत्रे तयार केली होती. फिर्यादी यांना ते ज्या ठिकाणी सही करावयाला सांगत, तेथे ते सही करत. कारण पॉवर ऑफ अ‍ॅटर्नीच करायची होती. त्यावेळी फोटो व कागद चुकला असल्याचे संभाजी थोरवे यांनी सांगून पुन्हा त्यांचा सब रजिस्टार ऑफिसमध्ये फोटो व सही घेतली. त्यावेळी कागद चुकला असेल, असे ग्रहीत धरुन पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी चेक केली असता ती बरोबर होती. त्यानंतर त्यांनी सह्या केल्या सर्व कागदपत्रांवर साक्षीदार म्हणून त्यांचीच लोके होती. २४ नोव्हेंबर रोजी अमित कलाटे यांनी फिर्यादी यांना सांगितले की, पॉवर ऑफ अ‍ॅटर्नीमध्ये पैशांचा काही उल्लेख केलेला नाही, मी तुम्हाला व्याजाने पैसे दिले, याबाबत मला काहीतरी सिक्युरिटी पाहिजे, त्यासाठी तुम्ही गाळ्याचे रेंट अ‍ॅग्रीमेंट करुन द्या, असे सांगून त्यांच्याकडून रेंट अ‍ॅग्रीमेंट करवुन घेतले.

त्यामध्ये ८० हजार रुपये भाडे दाखविले होते. तोपर्यंत त्यांना केवळ पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी झाल्याचे माहिती होते. काही महिन्यांनी अमित कलाटे व सुरज लोखंडे यांनी मुद्दलाची रक्कम देण्याचा तगादा लावला. तेव्हा त्यांनी हे गाळे विकून त्यांची रक्कम परत करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांनी गाळा विकण्यासाठी एजंटला जून २०२५ मध्ये पेपर दिले. एजंटने सर्च रिपोर्ट काढला. तेव्हा दोन्ही गाळे ८ नोव्हेबर २०२३ रोजी अमित कलाटे यांच्या नावा खरेदी खताने झाले असल्याचे दिसून आले. त्यांनी कागदपत्रे पाहिली़ तेव्हा अगोदर खरेदी खत झाले. त्यानंतर कागद चुकला म्हणून त्यांच्याकडून पुन्हा फोटो व सही घेतली. ती कुलमुखत्यार पत्रावर घेतली होती. अगोदर सही, फोटो घेतले़ ते खरेदी खतावर घेतले होते, असे दिसून आले.

दरम्यान, उत्कर्ष स्मॉल फायनान्स कंपनीचे एक गाळा ताब्यात घेतला होता. सुरज लोखंडे व कलाटे यांनी बँकेने ठेवलेल्या सिक्युरिटी गार्डला मारहाण करुन त्याला हाकलून लावले असल्याचे त्यांना समजले. खरेदी खताच्या आधारे त्यांनी १९ जून २०२५ रोजी अमित कलाटे मयुरेश विक्रम वैशंपायन यांना २ कोटी ९० लाख रुपयांना विकले आहेत. अमित कलाटे यांनी व्याजापोटी ३५ लाख रुपये देणार होता. ते पैसे खरेदी खतामध्ये त्यांना दिल्याचे दाखविण्यात आले होते. ३ कोटी बाजार मुल्य असताना त्यांनी फिर्यादी यांची फसवणूक करुन ७५ लाख रुपये इतक्या कमी किंमत कागदोपत्री नमूद केली होती. त्यांच्या गाळ्यातील लॉकरमध्ये २० तोळे सोने आणि २ लाख रुपये होते़ ते लॉकरही दिसून आले नाही़. त्यामुळे त्यांनी आपली शेखर चिंधे व अमित कलाटे यांनी फसवणुक केल्याची फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक समीर करपे तपास करीत आहेत.

You may have missed