Pune Crime News | तीन वर्षात दुप्पट परतावा देण्याची कबुल करुन 80 लाख रुपयांना गंडा घालणार्‍या देशपांडे लॅन्डमार्कच्या योगेश देशपांडेवर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | शेती विकून आलेल्या  पैशांची गुंतवणूक करताना ३ वर्षात दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवुन व्यावसायिकाची ८० लाख रुपयांची फसवणूक करणार्‍या देशपांडे लॅन्डमार्कच्या योगेश देशपांडेंवर चतु:श्रृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Deshpande Landmark)

याबाबत विशाल अरुण होनराव (वय ४५, रा. लक्ष्मी वृंदावन सोसायटी, रायकर मळा, धायरी) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक योगेश अंबादास देशपांडे Yogesh Ambadas Deshpande (वय ४६, रा. श्रद्धा सुनिता सोसायटी, बांबु गल्ली, येरवडा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार गोखलेनगरमधील बाबा हॉटेल येथे १ जानेवारी २०२१ ते २०२५ दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल होनराव हे केबल व्यावसायिक आहेत. मंचर येथील जमीन विकून त्यांना ऑगस्ट २०२० मध्ये ७० लाख रुपये मिळाले होते. हे पैसे योग्य ठिकाणी गुंतवणुक करायचे म्हणून त्यांनी मामा राकेश मिटकरी (वय ५५, रा. गोखलेनगर) यांना विचारले. त्यांनी सांगितले की, माझे साडु योगेश अंबादास देशपांडे हे बांधकाम व्यवसायिक असून त्यांची देशपांडे लॅन्डमार्क प्रा. लि. नावाची कंपनी आहे. ते कंपनीचे संचालक आहेत. त्यांच्या प्रोजेक्टमध्ये पैशांची गरज आहे. तुला इच्छा असेल तर मी बोलुन घेतो, असे सांगितले. त्यानंतर देशपांडे यांच्या समवेत दोन तीन बैठका झाल्या. त्यांनी मिटकरी यांच्या समोर तुम्ही गुंतवणुक केलेल्या रक्कमेच्या दुप्पट रक्कम तीन वर्षांनी तुम्हाला देतो, असे सांगितले.

त्यानंतर १ जानेवारी २०२१ रोजी त्यांनी देशपांडे यांच्याकडे ४० लाख रुपयांची गुंतवणूक केली. फेब्रुवारी २०२४ मध्ये गुंतवणुक केलेल्या पैशांना ३ वर्षे पूर्ण झाल्यावर ते मामा राकेश मिटकरी यांच्यासह योगेश देशपांडे यांना भेटले. त्यांच्याकडे पैशांची मागणी केल्यावर ते पैसे देतो, असे आश्वासन देऊन निघून गेले. त्यानंतर वेळोवेळी संपर्क साधला असता ते केवळ आश्वासन देत होते. पुढे त्यांनी फोन उचलणे बंद केले. जून २०२५ मध्ये योगेश देशपांडे यांनी फिर्यादी यांना अ‍ॅड. केळकर यांच्या शनिवार पेठ कार्यालयात मिटिंगसाठी बोलावले. तेथे फिर्यादी व त्यांचे भाऊ मयुर राजू मिटकरी हे गेले. त्यांनी गुंतवलेल्या पैशांची मागणी केली असता तेथे योगेश देशपांडे यांनी फिर्यादी यांना ‘‘तू येथून निघुन जा, तुला काय करायचे ते कर, मी तुला पैसे देणार नाही, तुला कोर्टात खेचतो की नाही बघ व तुमच्या सगळ्यांना दाखवतो की मी कोण आहे ते,’’ अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांनी अनेक वेळा पैशांची मागणी केली. तरीही त्यांनी पैसे न दिल्याने शेवटी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक स्नेहल पाटील तपास करीत आहेत.