Pune Crime News | पुणे : सोशल मीडियातील ओळखीतून अल्पवयीन युवतीला पळवुन नेण्याची धमकी देणार्या परप्रांतिय अयान नसीम अहमद मलिकला अटक, आईच्या लक्षात आल्याने पुढील प्रसंग टळला
पुणे : Pune Crime News | सोशल मीडियातून ओळख करुन घेऊन तरुणींना जाळ्यात ओढण्याचे प्रकार वाढलेले आहेत. विशेषत: वयात येणार्या युवतींना आमिष दाखवून पळवुन नेल्याच्या अनेक घटना समोर येत आहे. एका आईने आपल्या १५ वर्षाच्या मुलीच्या सोशल मीडियावर लक्ष ठेवल्याने पुढील अनर्थ टळल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावर गेल्या ५ महिन्यांपासून ओळख असलेल्या तरुणाने अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन तिचा हात पकडून पळवुन नेण्याची धमकी देणार्या तरुणाला खराडी पोलिसांनी अटक केली आहे.
अयान नसीम अहमद मलिक (वय १९, रा. थिटे नगर, खराडी, मुळ अथर कॉलनी, कोतवाली, बिजनोर, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत एका ३६ वर्षाच्या महिलेने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०२५ पासून सुरु होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची १५ वर्षाची मुलगी व आरोपी अयान मलिक यांची इन्स्ट्राग्रामवरुन ओळख झाली. अयान मलिक हा मुळचा उत्तर प्रदेशामधील राहणारा आहे. गेल्या सहा महिन्यांपासून तो पुण्यात आला आहे. तो खराडीमधील एका केशकर्तनालयात काम करतो.
अयान याने या युवतीशी इन्स्ट्राग्रामवरुन ओळख काढली. त्यांचे सोशल मीडियावर बोलणे सुरु झाले. तो ही युवती राहते त्या घराजवळ येऊ लागला. तिचा वारंवार पाठलाग करु लागला. एकदा तिचा हात पकडून तो तिला म्हणाला, ‘‘ तु माझ्या सोबत चल नाही तर तुला पळवुन नेईन. तुझे आई बाबा काय करतात ते बघु,’या प्रकाराने ही युवती घाबरुन गेली. युवतीच्या आईला तिची चलबिचल लक्षात आली. तिने युवतीचे सोशल अकाऊंट चेक केले. तिला अयान विषयी विचारले. त्यावेळी तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर या आईने खराडी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. पोलिसांनी तातडीने हालचाल करुन अयान मलिक याला ताब्यात घेतले. पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. पोलीस उपनिरीक्षक माधुरी बिडवे तपास करीत आहेत.
