Pune Crime News | तरुणीच्या ब्लॅकमेल करण्याच्या त्रासाला कंटाळून तरुणाने 12 मजल्यावरील टेरेसवरुन उडी मारुन संपवले जीवन, पोलिसांनी तरुणीवर केला गुन्हा दाखल
पिंपरी/पुणे : Pune Crime News | जनरल स्टोअर्स असलेल्या दुकानात कानातील झुमका पडल्याचे सांगून दुकानदार तरुणाकडून १ लाख रुपयांची खंडणी वसुल करुन आणखी पैसे देण्यासाठी त्रास देणार्या तरुणीच्या छळाला कंटाळून एका दुकानदार तरुणाने इमारतीच्या १२ मजल्यावरील टेरेसवरुन उडी मारुन आपले जीवन संपविले. भोसरी पोलिसांनी या तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मरणापूर्वी या दुकानदार तरुणाने मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून ही सर्व माहिती दिली आहे.
विनोद पेमाराम चौधरी (वय २६, रा. डिस्टीनेशन क्षितीत सोसायटी, भोसरी, मुळ रा. पाली, राजस्थान) असे मृत्यु पावलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांचे वडिल पेमाराज लसाराम चौधरी (वय ५८) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सरोज नागनाथ माने (Saroj Nagnath Mane) या तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना क्षितीज सोसायटीत २७ जुलै रोजी सकाळी पावणे अकरा वाजता घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेमाराम चौधरी यांचे आळंदी रोडवर वैभव मिनी मार्केट, जनरल स्टोअर हे दुकान आहे. ते व पत्नी राजस्थानला गेले होते. त्यांचा मोठा मुलगा विनोद चौधरी हा गेली २ वर्षे दुकान सांभाळत होता. तो शारीरीक दृष्ट्या ५२ टक्के अपंग आहे. त्याने २७ जुलै रोजी सकाळी पावणेअकरा वाजता राहत्या इमारतीच्या टेरेसवरुन उडी मारल्याने त्याचा मृत्यु झाला. त्याच्या लहान बहिणीने त्याचा मोबाईल पाहिला. त्यात विनोद याने एक व्हिडिओ रेकॉर्ड करुन ठेवला होता.
या व्हिडिओमध्ये विनोद म्हणतो की, मला एका महिलेने फसवले आहे. तिच्यामुळे मी सुसाईट करत आहे. ती एके दिवशी दुकानात आली. तिने ड्रम हवा असल्याचे सांगितले. ड्रम पाहण्याच्या बहाण्याने ती दुकानाच्या आत आली. त्यानंतर मला नको, असे बोलून ती निघून गेली. दुसर्या दिवशी तिचा फोन आला. माझ्या कानातील झुमका दुकानात पडला, असे सांगितले. मी संपूर्ण दुकानात पाहिले. पण, झुमका मिळाला नाही. त्यानंतर रात्री ती एका माणसाला घेऊन दुकानावर आली. ते जबरदस्ती करु लागले. मला ८५ हजार रुपये दे, नाही तर पोलीस कंप्लेक्ट करेल, असे धमकावु लागली. माझ्याजवळ इतके पैसे नव्हते. मी बजाज फायनान्समधून कर्ज घेऊन १ लाख रुपये दिले. तरी ही मानायला तयार नाही. मला ब्लॅकमेक करत आहे. मला आणखी ५५ हजार रुपये पाहिजे, सोन्याचा भाव खूप वाढला आहे. माझ्यासमोर कोणताही ऑपशन नाही. ती सह्याद्री हॉटेलमध्ये काम करते. सरोज नागनाथ माने असे तिचे नाव आहे. सरोज नावाने तिचा नंबर सेव्ह केलेला आहे. असे विनोद याने व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
याबाबत तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुनिल दौंड यांनी सांगितले की, सरोज माने हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तिचा मोबाईल ट्रेस करण्याचे काम सुरु आहे.
